CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजीत दीपकेने दिली मोठी अपडेट
देशातील विविध परीक्षा आणि सरकारी भरती चाचण्यांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेच्या विरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP Protest) केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

CJP Protest : देशातील विविध परीक्षा आणि सरकारी भरती चाचण्यांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेच्या विरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी‘ने (CJP Protest) केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी पक्षाने दिल्लीतील ऐतिहासिक जंतरमंतर मैदानावर भव्य आंदोलन केले. हे आंदोलन केवळ सुरुवातीचे असून, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन (CJP Protest) मागे घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिला आहे.
जंतरमंतरवरील आंदोलन ठरले यशस्वी
शनिवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या बॅनरखाली हजारो आंदोलक एकत्र आले होते. या आंदोलनात सुमारे ६,००० ते ७,००० लोकांचा सहभाग होता, ज्यामुळे हे आंदोलन (CJP Protest) प्रचंड यशस्वी ठरल्याचा दावा अभिजीत दीपके यांनी केला आहे.
परीक्षांमधील घोटाळे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी आंदोलकांनी शिक्षण मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी लावून धरली. दीपके यांनी आंदोलकांना धीर देत, “कोणत्याही परिस्थितीला घाबरण्याची गरज नाही,” असे आवाहन यावेळी केले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जंगी स्वागत
दिल्लीतील आंदोलन (CJP Protest) यशस्वी करून अभिजीत दीपके रविवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एमआयडीसी वाळूज भागातील आपल्या निवासस्थानी परतले. गृहगावी आगमन होताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली.
“जंतरमंतर येथील आंदोलनाला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता, आता हे आंदोलन केवळ दिल्लीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशात पसरवले जाईल. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत कॉकरोच जनता पार्टी पाऊल मागे घेणार नाही. हे आंदोलन देशव्यापी करण्यासाठी आम्ही लवकरच एक सविस्तर कृती आराखडा (Action Plan) तयार करत आहोत,” अशी माहिती दीपके यांनी दिली.
केंद्र सरकारला एक आठवड्याचा अल्टिमेटम
दरम्यान, दिल्लीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे. पक्षाने म्हटले आहे की, “केंद्र सरकारने एकतर धर्मेंद्र प्रधान यांना तातडीने पदमुक्त करावे किंवा त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा.
यावर निर्णय घेण्यासाठी आम्ही सरकारला एका आठवड्याची मुदत (अल्टिमेटम) देत आहोत. जर एका आठवड्यात योग्य कारवाई झाली नाही, तर संपूर्ण देशभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
परीक्षांमधील कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या असंतोषाला आता राजकीय परिमाण लाभले असून, कॉकरोच जनता पार्टी आगामी काळात या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






