शहरातील पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत

नगर -शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नव्या मुख्य जलवाहिनीला बाभळगावजवळ गळती लागल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शहरात पुढील तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन मुख्य जलवाहिनीला बाभळगाव शिवारात पवार वस्ती जवळ पाण्याच्या व हवेच्या दाबाने मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. जलवाहिनीद्वारे मुळानगर येथून होणारा पाणी उपसा बंद करून जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे दुरुस्ती कामास अवधी लागणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यात उशिर लागणार आहे.
दरम्यान, दुरुस्तीच्या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, स्टेशन रोड, विनायकनगर, आगरमळा, कायनेटीक चौक परिसरा, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर आदी भागात आज सकाळी 11च्या नंतर पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
या परिसरात उद्या (दि. 16) पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. बुधवारी सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्त गल्ली, माळीवाडा, माणिक चौक, आनंदी बाजार, जुने महापालिका कार्यालय परिसर, पंचपीर चावडी, बालिकाश्रम रोड या भागात पाणीपुरवठा होणार नसून, या भागातील पाणीपुरवठा हा बुधवार ऐवजी गुरुवार दि. 17 रोजी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी ज्या भागात पाणी पुरवठा होणार नाही, त्यांनी शुक्रवारी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.





