नगर – महानगरपालिकेची कोणतीही गुंतवणूक न करता पथदिव्यांच्या वीजबिलात ७२ टक्क्यांपर्यंत बचत

नगर – देशाच्या पंतप्रधानांनी ५ जानेवारी २०१५ रोजी संपूर्ण भारतभर पारंपारिक पथदिवे बदलून स्मार्ट एनर्जी एफिशियंट एलईडी स्ट्रीट लाइट लावण्याचा स्ट्रीट लाईट नॅशनल प्रोग्राम लाँच केला होता. या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारने पारंपारिक दिवे बदलून स्मार्ट एलईडी स्ट्रीट लाइट लावण्याचे धोरण जाहीर केले. त्यानुसार महानगरपालिकेने “बचत मॉडेल” अभियानांतर्गत एलईडी दिवे बसवणे व त्याची देखभाल करण्यासाठी निविदा काढून संस्थेची नियुक्ती केली आहे.
संस्थेमार्फत शहरातील जुने २५२२६ पथदिवे काढून त्या जागेवर नवीन एलईडी दिवे बसवले आहेत. आजमितीला संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये ३२४५० एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. महानगरपालिकेने कोणतीही भांडवली गुंतवणूक न करता ही योजना यशस्वीपणे राबविली आहे. यातून महानगरपालिकेच्या पथदिव्यांच्या वीजबिलात सुमारे ७२ टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे.
महानगरपालिकेने पथदिवे बसवणे व त्याची ७ वर्ष देखभाल दुरुस्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून ई स्मार्ट एनर्जी सोल्युशन्स लि. या संस्थेची नियुक्ती केली आहे. संपूर्ण शहरात आवश्यकतेनुसार एलइडी दिवे बसवणे व त्याची देखभाल करण्यासाठी या संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे. महानगर पालिकेकडून कोणतीही गुंतवणूक न करता सर्व दिवे कंत्राटदार बदलणार आहे. तसेच, पॅनल बसवणार आहे. वीजबिलात जी बचत होईल त्यातून 84% वाटा संस्थेला व 16% वाटा महानगरपालिकेचा असणार आहे.
संस्थेने राष्ट्रीय प्रकाश संहिता म्हणजेच नॅशनल लाईट कोडनुसार पथदिवे लावून प्रकाशाची लक्स लेव्हल राखणे करणे आवश्यक आहे. संहितेनुसार आवश्यक लक्स लेव्हलपेक्षा सध्या जास्त लेव्हल येत आहे. ऊर्जा बचत प्रकल्प असल्याने, कंत्राटदार संस्था लक्स लेव्हल राखण्याच्या दृष्टीने आवश्यक वॅटेचे दिवे निवडण्यास मोकळे आहेत. या दिव्यांच्या माध्यमातून नॅशनल लाईट कोडनुसार किमान लक्स लेव्हल मिळत असेल तर, कंत्राटदाराने दिलेले दिवे योग्य आणि पुरेसे आहेत. सध्या निविदेत जी बचत प्रस्तावित केली होती, ती साध्य होत आहे. या प्रकल्पांतर्गत महापालिकेचा वीजबिलाचा व देखभाल दुरुस्ती करण्यासाठीचा खर्च कमी झाला आहे. तसेच, बचतीतून 16% वाटा महानगरपालिकेला मिळत आहे लावलेले एलईडी दिवे आणि पॅनेल करार संपल्यावर शून्य किंमतीवर महानगरपालिकेकडून हस्तांतरित होणार आहेत.
सद्यस्थितीत प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहे. संस्थेने डिसेंबर २०२३ पर्यंत ३२४५० दिवे लावले असून पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करून त्यांच्याकडून तपासणी करून घेण्यात आली आहे. त्यांनी समाधानकारक अहवाल दिला आहे. सध्या ज्या भागात पोल उपलब्ध नसल्यामुळे दिवे बसवण्यात आलेले नाहीत, त्या भागाची पाहणी करून विद्युत विभागाकडून अहवाल घेतला जात आहे. विभागाची बैठक घेऊन लवकरात लवकर या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पोल उपलब्ध करून देण्यात येतील व दिवे बसवण्यात येतील. नागरिकांना पथादिव्यांच्या अडचणी व सूचनांसाठी टोल फ्री नियंत्रण कक्ष क्रमांक 1800 833 4413 उपलब्ध करण्यात आला आहे. सदरील नियंत्रण कक्ष हे सुरळीतपणे सुरू असून टोल फ्री क्रमांक देखील चालू आहे
शहरातील मालमत्ता – १.२० लाख
शहरातील एलईडी दिवे – ३२, ५००
शहरातील जूने पथदिवे – ३५,०००
हायड्रोलिक वाहन – ०१
दरमहा येणारे वीजबिल – ४५ लाख





