पिंपरी | चिखलीतील बेकायदा पार्किंगमुळे नागरिक त्रस्त

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिखली येथील, सिटी प्राइड शाळेच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज रस्त्यावर लागणाऱ्या बेकायदेशीर ट्रक व इतर वाहनावर तातडीने कारवाई करावी. आणि स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे निवेदनामार्फेत केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सिटी प्राइड शाळा चिखली याच्या बाजूच्या श्री. छत्रपती संभाजी महाराज रोडवरील आकाशवेध सोसायटीपासून लव-नेस्ट सोसायटीपर्यंतच्या रस्त्यावर दिवसा आणि रात्रीच्या वेळी अनेक बेकायदेशीर ट्रक, वाहने उभी असतात.
त्यामुळे येथे रहदारीस अडथळा येतो. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस या वाहनाच्या बाजुला बसून अनेक नागरिक याठिकाणी मद्यपान तसेच इतर बेकायदेशीर गोष्टी करतात.
या रस्त्यावर लागलेल्या बेकायदेशीर वाहनांमुळे अनेकवेळा या ठिकाणी अपघात देखील झालेले आहेत. तसेच या ठिकाणी बेकायदेशीर धंदे देखील चालू झालेले आहेत. तरी याकडे तातडीने लक्ष देऊन आपल्या स्तरावरुन आदेश काढून या रोडवर थांबणारी सर्व ट्रक आणि इतर वाहने तात्काळ बाजूला करून संबंधित वाहन मालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
तसेच, पुढील आठ दिवसांमध्ये या बेकायदेशीर ट्रक आणि वाहनांवर कारवाई न झाल्यास फेडरेशन मार्फत रस्ता रोको केला जाईल, असा इशाराही संजीवन सांगळे यांनी निवेदनात दिला आहे.
येथील बेकायदेशील वाहनांन बद्दल वारंवार तळवडे वाहतूक शाखेस सांगून देखील कोणतीही कारवाई होत नाही. या रस्त्यावर, शिवरोड तसेच इतर आजूबाजूच्या रोडवर देखील असेच वाहने उभे केली जातात.
या वाहनामुळे सोसायटीमधील नागरिकांना तसेच महिलांना प्रवास करताना खूप मोठ्या प्रमाणात अडचण होते आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील आहे. यावर पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून लवकरात लवकर कारवाई व्हावी अन्यथा देहू-मोशी रोडवर फेडरेशन मार्फत रस्ता रोको करण्यात येईल. संजीवन सांगळे, अध्यक्ष चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.





