पाथर्डी -शहर व तालुक्यात करोना पॉझिटिव्हचे रुग्ण मोठया प्रमाणात वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी शहर व तालुक्यातील नागरिकांना घाबरु नका, सतर्क रहा, आणि प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन केले आहे.
गेल्या आठवडयापासून पाथर्डी शहर व तालुक्यामध्ये करोनाचे रुग्ण हळूहळू वाढत होते. मात्र, काल एकाच दिवसात पाथर्डी शहरात 22 व तालुक्यात मिळून 42 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने 17 जुलै ते 23 जुलैपर्यंत पाथर्डी शहर कंन्टेन्मेंट झोन घोषित केले असून अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिले आहेत.
आमदार राजळे यांनी विभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, व नगरपालिका मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी चर्चा करुन करोनाचे रुग्ण वाढू नये व करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या आहेत . पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, ग्रामपातळीवरील प्रशासन यांना सहकार्य करावे, असे आवाहन आमदार राजळे यांनी केले आहे.