पुणे जिल्हा | नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करा

बारामती, (प्रतिनिधी)- दीपावलीनिमित्त बारामती शहरात दरवर्षी खरेदीसाठी लक्षणीय गर्दी होते. शहरात होणारी गर्दी व वाहतूक कोंडी पाहता यावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पुढाकार घेतला.
बैठकीत अनेक उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यामध्ये दीपावलीच्या कालावधीत होणाऱ्या गर्दीमुळे करावयाचे वाहतूक नियमन, वाहनांचे पार्किंग, त्यावर करावयाच्या उपायोजना यावर अनेकांनी आपापली मते व्यक्त करीत त्याअनुषंगाने नियोजन करण्यात आले.
यावेळी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन यादव यांनी यावेळी केले. बारामतीसह आसपासच्या तालुक्यातील व पंचक्रोशीतील नागरिक येतात. यावेळी हजारो वाहनांच्या बेशिस्त वाहतूकीमुळे आणि पार्किंगमुळे मोठी कोंडी होते.
त्यामुळे सणासुदीत नागरिक अडकून पडतात. पोलीस निरीक्षक यादव यांनी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियोजन बैठकीचे आयोजन केले होते.
शहरातील मारवाड पेठेतील राजस्थान कापड दुकानात सकाळी १० वाजता बारामती शहरातील सर्व व्यापारी, नगरपरिषदेकडील अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वाहतूक अंमलदार आदींची संयुक्त बैठक झाली. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांना सूचना केल्या.
बाजारपेठेत वाहतूक नियोजनासाठी आवश्यक ते सूचनाफलक लावण्यात येणार आहेत. वाहतूक नियोजनासाठी आणखी मनुष्यबळाची मागणी केली आहे. वाहतुकीचे समस्यांबाबत थेट संपर्क करण्याचे आवाहन यादव यांनी केले आहे.
यावेळी व्यापारी सुशीलकुमार सोमाणी, बारामती व्यापारी महासंघ अध्यक्ष सचिन बुधकर, महावीर पथ व्यापारी असोसिएशन अध्यक्ष जगदीश पंजाबी, सुरजीत झगडे, मनोज खुटाळे, सम्यक छाजेड, अक्षय छाजेड, गोकुळ लोळगे, आशिष ढाकाळकर, अण्णा महाडिक,
संजय काबरा, सोनिक पंदारकर, हार्दिक गुजराथी, यश झगडे, हृषीकेश निलाखे, सुनील धुमाळ, अतिक्रमण विभाग बारामती वाहतूक शाखेचे सुभाष काळे, सुधाकर जाधव, प्रदीप काळे, अजिंक्य कदम, रेश्मा काळे, माया निगडे, स्वाती काजळे, सीमा साबळे, प्रज्योत चव्हाण उपस्थित होते.
छोट्या- मोठ्या व्यापाऱ्यांनी दक्षता घ्यावी
यादव म्हणाले की, नागरिकांना गुणवडी चौक ते गांधी चौक तसेच भिगवण चौक ते गांधी चौकात जाण्यास हरकत नाही. परंतु विरुद्ध दिशेने कोणीही जाऊ नये, संबंधित ठिकाणी एकेरी वाहतूक असल्याने त्यानुसार नियम पाळावेत.
आपली वाहने पार्किंग करताना पार्किंग असेल तिथेच पार्क करावीत. चारचाकी वाहने पार्किंगकरिता सिध्देश्वर मंदिराजवळील व नीरा नदीजवळील स्मशानभूमीजवळ रोडचा वापर करावा.
परंतु अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, वाहने पार्क करण्यासाठी शक्यतो गुणवडी चौक येथील मंडई पार्किंगचा वापर करावा, लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी साहित्य दुकानाबाहेर लावू नये.
रस्त्याच्या बाजूला बसणारे छोट्या व्यावसायिकांनी पार्किंगचा व वाहतुकीस अडथळा होणार नाही या बाबी लक्षात घेऊन व्यवसाय करावा, छोटे – मोठे व्यावसायिक व्यापारी व नागरिकांनी सर्व सूचनांचे पालन करून वाहतूक पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.





