Nagar | नगरकरांनो सावधान; प्राणघातक आजार होतोय व्हायरल

नगर, (प्रतिनिधी) – पावसाळ्यातील साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, नेहमीप्रमाणे साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून शहरात 4 दिवस सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे घरोघरी सर्दी, खोकला आणि तापीचे रुग्ण आढळून येत आहेत.
यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. वेळीच काळजी घेतली नाही तर व्हायरल इन्फेक्शनचे डेंग्यू, चिकनगुणिया, टायफाईड, गोचीडताप या आजारांचेमध्ये रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असे डॉक्टरांचे मत आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाकडे सध्या डेंग्यू 12, चिकनगुणिया 13, टायफाईड 18, गोचीडताप 10 अशी रुग्णांची नोंद आहे. या व्यतिरिक्त मात्र, सर्दी, खोकला आणि तापीच्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. सरकारीसह खासगी रुग्णालयांमध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रुग्णांची मोठी गर्दी दिसत आहे. सर्दी, खोकला आणि तापाचे प्रमाण शाळकरी मुलांमध्ये अधिक आहे.
का वाढत आहे? रुग्णांची संख्या
गेल्या महिनाभरापासून शहरात कमी अधिक स्वरूपात पाऊस होत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहेत. हिवतापाचा प्रादुर्भाव अॅनफिलीस डासामुळे तर डेंग्यूचा प्रादुर्भाव हा एडीस इजिप्ती डासांमुळे होते. या डासांची पैदास स्वच्छ पाण्यात होते, या डासांनी माणसाला डंख मारल्यास हिवताप व डेंग्यूची लागण होते.
निष्काळजीपणाच कारणीभूत
घर व परिसरात पडलेले भंगार, मोकळी भांडी, मोठ्या घरातील कुंड्या, नारळाच्या करोट्या, टायर यामध्ये पाणी साचते. हिच ठिकाणे डासांची उत्पत्तीस्थाने बनत आहेत. महापालिकेकडून सूचना देऊनही नागरिक याकडे गांभिर्यान पाहत नाहीत. साथीचे आजार रोखण्यासाठी नागरिकांनी घर व परिसरातील डास उत्पत्तीची ठिकाणी नागरिकांनी नष्ह करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात वाढणारे साथीचे आजार लक्षात घेत मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत. शहरात औषध व धूर फवारणी सुरू आहे. शहरात नुकतेच कंटनेर सर्व्हे करून डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करण्यात आली आहेत. तसेच आरोग्य कर्मचार्यांमार्फत नागरिकांमध्ये जनजागृती सुरू आहे.
आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना बरोबर घेऊन जनजागृती व स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनीही आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा तसेच घर व परिसरातील डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावीत. डॉ. अनिल बोरगे, आरोग्याधिकारी, महापालिका





