नगरकरांनो, काळजी घ्या.. करोना होतोय जिल्ह्यात वेगवान

नगर – करोना हा घातक साथरोग अजूनही संपलेला नाही. मागील काही दिवसांपासून तर या आजाराने पुन्हा वेग घेतला आहे. देशभरात करोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. नगर जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या काळजीत टाकणारी होती. या दिवशी तब्बल 89 नवे रुग्ण सापडल्याने प्रशासनाचेही टेन्शन वाढले आहे.
देशात करोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. राज्यातही अनेक ठिकाणी रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. नगरमध्ये आधी रुग्णसंख्या दहाच्या आत होती. काही दिवसांपासून मात्र ही संख्या वाढत आहे. शनिवारी जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत 39, अँटीजने चाचणीत 25 रुग्ण आढळले. नगर शहरात सर्वाधिक म्हणजे 16 रुग्ण सापडले आहेत. तसेच शेवगाव 14, भिंगार कॅंटोन्मेंट 12, श्रीरामपूर 10, राहाता 8, पारनेर 7, नगर तालुका 6, पाथर्डी 6, संगमनेर 4, जामखेड 2, नेवासा 1, श्रीगोंदा 1 असे एकूण 89 रुग्ण सापडले. विशेष म्हणजे, बऱ्याच दिवसांनंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे.
त्यामुळे करोनाचा धोका आणखी वाढला आहे. तर दुसरीकडे करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क वापरण्यासह अन्य महत्वाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडूनही तसे आवाहन नागरिकांना सातत्याने केले जात आहे.





