सत्तांतराने ‘भाग्यश्री’वर वर्दळ; हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून निधींची यादी तयार

इंदापूर तालुक्यातील भाजपमध्ये आनंदाचे वातावरण
…तरीही निष्ठावंत हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत राहिले
विजय शिंदे
वडापुरी – तीन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने मोठी ताकद लावल्याचे दिसत आहे. यामुळे माजी मंत्री ळर्षवर्धन पाटील यांना चांगलेच बळ मिळाले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. माहाविकास आघाडीच्या काळात विकासकामांपासून वंचित राहिलेले गाव गाड्यातील कार्यकर्त्यांची आता विकास कामासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगल्यावर लगबग दिसून येत आहे.
गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाल्यानंतरही केंद्रात आपले सरकार आहे. त्यामुळे इंदापुरात आपल्याला ताकद मिळेल, या आशेवर असणाऱ्या कार्यकर्त्यांचा महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्याने भ्रमनिरास झाला. अनपेक्षितपणे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून विविध सहा खात्यांचे राज्यमंत्रीपद देण्यात आले. सोबतच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही देण्यात आले. त्या माध्यमातून त्यांनी इंदापुरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे आणली.
अनपेक्षितपणे झालेल्या बदलामुळे भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच मुस्कटदाबी झाल्याने काही जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला; परंतु काही निष्ठावंत गाव पुढारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत राहिले. इंदापूर तालुक्यात विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना भाजपमध्ये अस्थिरता व अस्वस्थता होती; परंतु राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे गट व भारतीय जनता पक्षाचे सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील भाजपमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला. यावेळी राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांना जनतेचा कल मिळाला होता; परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्याने भारतीय जनता पक्षाला विरोधी बाकावर बसावे लागले.
विधानसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये नेहमीच काट्याची टक्कर असते. गेली अडीच वर्षात राज्यमंत्री पदावर काम करताना दत्तात्रय भरणे यांनी विविध खात्यांच्या माध्यमातून इंदापुरात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. निधी उपलब्ध करून देत असताना भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातील ग्रामपंचायतमध्ये विकासकामे झाली नसल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला.
भाजप समर्थक ग्रामपंचायतींचाही विकास
तीन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड झाली. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आता आपल्या गावात विकास कामे मिळावी यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री बंगल्यावर कार्यकर्त्यांची वर्दळ पाहायला मिळत आहे. आजी- माजी आमदारांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात निधी उपलब्ध होऊन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचा समतोल विकास साधणार? अशी चर्चा सुरू आहे.





