Nagar | तोफखाना पोलीस ठाण्यासमोर सिनेस्टाईल हाणामारी

नगर, (प्रतिनिधी) – नगर शहरासह कायदासुव्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाला असून कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे शहरात दिसत आहे. शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यासमोरच दुचाकीवर सिनेस्टाईलने येऊन दहशत करत तिघाजणांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या घटनेने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. तोफखाना पोलीस ठाणे अन् तालुका दंडाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.२६) रोजी हातात दांडे घेवून नागरिकांमध्ये दहशत पसरविल्याची घटना घडली.
तसेच दुसरी घटना चाॅंदबीबी महालाच्या डोंगरावर व्यायाम करण्यासाठी गेलेल्या चुलता-पुतण्याला ५ जणांच्या टोळक्याने आम्ही नगरचे बाप आहोत, असे म्हणून लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. त्यामुळे शहरात खाकीचा धाक आहे. की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील कायदासुव्यवस्थेबाबत तसेच पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात खासदार नीलेश लंके यांनी गेल्या पाच दिवसांपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून न्याय गुन्हेगारांना सजा मिळावी यासाठी उपोषन केले.
तसेच तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत अनेक जुगार अड्डे, बिंगो, अवैध धंद्दे सुरु आहेत. त्याचा पाढा खासदार लंके यांनी वाचला होता. त्याचा प्रत्यय नागरिकांना शुक्रवारी (दि. २६) रोजी सायंकाळी तोफखाना पोलीसा ठाण्या परिसरात तसेच तालुका दंडाधिकारी कार्यालयासमोर आला.
शहरातील सावेडी उपनगरातील प्रोफेसर चौक ते तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दुचाकीवर हातात लाकडी दांडे घेऊन दहशत करत दुचाकीस्वाराला मारण्याच प्रयत्न झाला. यावेळी तो तहसीलकार्यालयाच्या आवारात पळाला असता तो वाचला.
तेथे असलेले पोलीस कर्मचारी यांनी वेळीच मदत केल्याने हा अनर्थ टळला. त्यामुळे अशी दहशत निर्माण करणार्यांवर वेळीच कारवाई करण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने खाकीचा धाक दाखवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
यावेळी तहसील कार्यालयासमोर चहा पिन्यासाठी आलेल्या नागरिकांच्या दुचाकीचे नुकसान झाले. पोलिसांनी वेळीच मदत केल्याने दुचाकीवर आलेले युवकांनी पळ काढला. तसेच ज्यांना मारहाण झाली त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत अनेक जुगार अड्डे, बिंगो, अवैध व्यवसाय सुरु आहेत. त्याकडे पोलीस ठाणे प्रमुखांनी लक्ष देण्याची गरज ही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.





