कोचिंग क्लासच्या तळघरात सुरु होता वेश्याव्यवसाय, सिडको पोलिसांनी केला पर्दाफाश

छत्रपती संभाजीनगर, – सिडकोतील एन-७ भागात एका कोचिंग क्लासच्या तळघरात सुरू असलेल्या शेअर मार्केट ब्रोकरच्या कार्यालयात वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश सिडको पोलिसांनी शनिवारी (१३ जानेवारी) केला. सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून यात दोन मुलींची सुटका करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी एका कोचिंग क्लासच्या संचालकासह एकाला अटक करण्यात आली असून महिलेला नोटीस बजावली आहे. सुनील रामचंद्र तांबट, संदीप मोहन पवार, ज्योती प्रकाश साळुंके अशी आरोपींची नावे आहेत.
एन-७ भागातील एका कोचिंग क्लासच्या तळघरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सिडको ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यावरून तेथे सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के व त्यांच्या पथकाने छापा मारला. पोलिसांनी यात दोन पीडित मुलींची यातून सुटका केली. पोलिसांनी या कारवाईत तिघांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक हजार रुपयांना पुरवत होता मुली –
आरोपी संदीप हा शेअर ब्रोकर असून त्याची ओळख महिला आरोपी ज्योती सोबत झाली. ज्योती ही सिडकोतील एका नामांकित शिक्षण संस्थेत काम करत होती. हे दोघे मिळून हा व्यवसाय करत होते. आरोपी तांबट त्यांचा पार्टनर होता, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.





