लंडन – ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या मध्य लंडनमधील पुतळ्याचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. या पुतळ्यावर लाल रंगाने पॅलेस्टिनी समर्थक घोषणा रंगवण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. चर्चिल यांच्या १२ फूट उंचीच्या पुतळ्याखालील चौथऱ्यावर झायोनिस्ट युद्ध गुन्हेगार अशी ज्यू विरोधी घोषणा रंगवल्याबद्दल ३८ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली, असे मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले. याच चौथऱ्यावर वांशिक हिंसाचार थांबवा आणि मुक्त पॅलेस्टीन असेही रंगवले होते. हा संशयित युवक मूळशचा नेदरलॅन्डमधील फ्री द फिल्टन २४ या पॅलेस्टीन ऍक्शन संघटनेशी संबंधित गटाचा कार्यकर्ता आहे, असे पोलिसांनी सांगितले. मात्र त्याचे नाव उघड केले गेले नाही.