पिंपरी : नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ख्रिसमस डेकोरेशन स्टार, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज आणि गोठा यांना महत्त्व असल्याने आता ख्रिसमसच्या पाश्वभूमी जोरदार तयारी सुरु असल्याचे चित्र शहरभर दिसून येत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म गोठ्यात झाला असल्यामुळे वाळलेले गवत, पुठ्ठा, लाल माती, पुतळ्यांचा वापर करून घरात व चर्च परिसरात प्रातिनिधिक स्वरूपाचा गोठा तयार करण्यात आला आहे. येशूच्या जन्माचा प्रसंग या सजावटीच्या माध्यमातून दिखवण्यात आला आहे. या गोठ्यात येशूची आई मारिया, वडील, लहान येशू, मेंढ्या, गायी यांचे पुतळे ठेवण्यात आलेले आहेत. तसेच घराच्या बाहेर स्टार लावण्यात आले असून घराला रोषणाई करण्यात आली आहे. कॅरल्स म्हणजे प्रभूचे आगमन जाहीर करणारी सुमधूर भक्तिगीते असतात. नाताळ सणानिमित्त कॅरल्स सिंगिंग केली जात असून थंडीत ख्रिस्ती बांधव एकमेकांच्या घरी जाऊन प्रभू येशूच्या स्तृतीची गीते गात आहेत. नाताळच्या आधीच्या आठवड्यापासूनच्या या आगमनकाळात युवक-युवतींचे वाद्यवृंद संध्याकाळच्या वेळी कॅरल्स गात फिरत आहेत. त्यांचे घरोघरी जोरदार स्वागत केले जात आहे.