प्रभात वृत्तसेवा पिंपरी – नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठ सजली आहे. यंदा सणात केक प्रेमींमध्ये आरोग्यपूरक ‘हेल्दी केक’ हा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. मैदा आणि साखरे ऐवजी तृणधान्ये, गूळ, मध, खजूर आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून बनविलेले केक नागरिकांच्या पसंतीस उतरले असून, घरगुती (होममेड) केकला मोठी मागणी वाढली आहे. शहरातील बेकरी, होम बेकर्स आणि ऑनलाईन ऑर्डर प्रणालीमुळे केकचे विविध प्रकार सहज उपलब्ध झाले आहेत. साध्या हेल्दी केकची किंमत ५०० रुपयांपासून सुरू होत असून, विशेष डिझाइन, कस्टमाइज आणि आलिशान केकची किंमत हजारोंच्या घरात पोहोचत आहे.कोरोना काळात घरबसल्या सुरू झालेला होममेड केक व्यवसाय आज अनेक महिलांसाठी उत्पन्नाचा आधार ठरला आहे. मधुमेह, लठ्ठपणा आणि बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत केकच्या सवयींमध्ये बदल होत असून, ‘टेस्टसोबत हेल्थ’ यावर भर दिला जात आहे. त्यामुळे पारंपरिक चवींसोबतच नवनवीन प्रयोगशील केक बाजारात दाखल झाले आहेत.नाताळनिमित्त प्लम केक, चॉकलेट वॉलनट, व्हेगन केक, न्यूयॉर्क स्टाइल ब्लूबेरी, कप केक यांना मोठी मागणी आहे. प्रौढांसाठी रम किंवा वाइन फ्लेवरचे केकही उपलब्ध असून, हे केक लहान मुलांसाठी देण्यात येत नाहीत, याची विशेष काळजी घेतली जाते. महिलांना शासनाचे पाठबळ केक आणि बेकरी व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाकडून महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या प्रशिक्षणांतून प्रमाणपत्र व विद्यावेतन देण्यात येत असून, अल्प गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होत आहे. समाजमाध्यमांच्या मदतीने कस्टमाइज केकचे ऑर्डर घेऊन अनेकांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. असे तयार होतात हेल्दी केक हेल्दी केक बनविताना मैद्याऐवजी गहू, रवा, तांदूळ, सात धान्यांचे पीठ, तर साखरेऐवजी गूळ, मध, खजूर वापरले जातात. गोडपणासाठी गाजर, बीट, स्ट्रॉबेरीसारखी हंगामी फळे वापरली जातात. तुपाऐवजी थंड दाबाचे तेल, क्रीमऐवजी सुकामेव्याची पावडर व मधाचे मिश्रण वापरले जाते. ड्रायफ्रूट केक, वाळवलेली फळे, बोर्नव्हिटा, हेल्थ ड्रिंक वापरूनही केक तयार केले जातात. काही खास सेलिब्रेशनसाठी ज्यूस टॅप असलेले कस्टमाइज केक, अनोख्या डिझाइनचे आणि थीम बेस्ड केकही तयार केले जातात. पिंपरी-चिंचवडमधील खवय्ये नवनवीन कल्पनांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे चित्र दिसत आहे.नाताळच्या सणात गोडवा जपत आरोग्याचीही काळजी घेणारा या हेल्दी केक ट्रेंड शहरात मोठा प्रतिसाद मिळत आहे.