मेढा – सामाजिक कार्याचा वसा जोपासणारे चोरांबे हे जावळी तालुक्यातील आदर्श गाव असल्याचे मत व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी व्यक्त केले. गणेशोत्सवाचे निमित्ताने चोरांबे येथील सर्वोदय क्रांती गणेशोत्सव मंडळाच्यावतीने महाप्रसाद आणि गुणगौरव सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार सदाशिव सपकाळ अध्यक्षस्थानी होते. जवळ म्हणाले, चोरांबे गावात राबवले जाणारे उपक्रम आदर्शवत आहेत. गेली अनेक वर्षे ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवताना, जावळीच्या मातीत घडलेल्या व समाजासाठी कार्य करणार्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जात आहे. यावेळी विलासबाबा जवळ यांना सामाजिक गौरव पुरस्कार देण्यात आला. रेल्वेतून निवृत्त झालेल्या कृष्णा सपकाळ यांचा सपत्नीक, केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झालेल्या डॉ. रुचिका दुंदळे, पदोन्नती मिळालेले ग्रामविकास अधिकारी रविकांत सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला. संतोष दुंदळे, अरुण जवळ, माजी सरपंच भिवराम सपकाळ, सूर्यकांत सपकाळ, राजेश सपकाळ, श्रीकांत सपकाळ, किरण सपकाळ, अनिल सपकाळ, सचिन सपकाळ, तुकाराम सपकाळ, श्रीरंग सपकाळ, ज्ञानदेव सपकाळ, विजय सपकाळ (गुरुजी), श्रीधर सपकाळ, दत्ता सपकाळ, लहुदास सपकाळ व ग्रामस्थ उपस्थित होते. सदाशिव सपकाळ, डॉ. रूचिका दुंदळे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच विजय सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. अंकुश सपकाळ (गुरुजी) यांनी सूत्रसंचालन केले.