Jamkhed News : चोंडी-इंदोर एसटी बस अखेर सुरू…! पांडुरंग माने यांच्या पाठपुराव्याला यश

जामखेड : गेल्या तीन ते चार वर्षांपासून बंद असलेली श्री क्षेत्र चोंडी ते इंदोर एसटी बस सुरू व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पांडुरंग माने यांनी महामंडळाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे जन्मभूमी ते कर्मभूमी असलेल्या चोंडी ते इंदोर एसटी बस सुरू करण्यात आली. आज पहाटे पाच वाजता जामखेड बस स्थानकातून एसटी बस सोडण्यात आली
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव असलेल्या जामखेड तालुक्यातील चोंडी येथून कर्मभूमी असलेल्या इंदोरपर्यंत एसटी बस सुरू करण्यात आली होती. मात्र, तीन ते चार वर्षापासून ही बस सेवा बंद करण्यात आली होती. दि ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने चोंडी ते इंदोर एसटी बस सुरू करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गटाचे ) पांडुरंग माने यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे केली होती.
त्यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा केल्यानंतर आज दि २९ मे रोजी चोंडी ते इंदोर एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. आज पहाटे पाच वाजता जामखेड बस स्थानकात पांडुरंग माने यांनी बसचे पुजन करून चालक वाहक यांचा सत्कार करुन बस मार्गस्थ झाली. यावेळी नितीन काशीद, दहिफळे, कुंडल राळेभात, सचिन शिंदे उपस्थित होते. या बसमुळे जन्मभूमी चोंडी ते कर्मभूमी इंदोर असा प्रवास करणे सोपे होणार असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव केला होणार आहे. ही बस सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.





