Chirag Paswan : तेजस्वींना चेहरा बनवून अल्पशी संधीही दवडली; चिराग यांनी उडवली महाआघाडीची खिल्ली

पाटणा : बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून राजदचे नेते तेजस्वी यादव यांचे नाव पुढे केले. त्या राजकीय खेळीची केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी खिल्ली उडवली. तेजस्वींना चेहरा बनवण्याच्या कृतीने बिहारमधील जंगलराजच्या आठवणी ताज्या केल्या. त्यातून निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची जी काही अल्पशी संधी असेल; तीसुध्दा महाआघाडीने दवडली, अशी शाब्दिक टोलेबाजी त्यांनी केली.
बिहारमधील सत्ताधारी एनडीएने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नसल्याची उपरोधिक टिप्पणी तेजस्वी यांनी केली. त्यावर पत्रकारांशी बोलताना चिराग यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री नितीश कुमार हेच एनडीएचे चेहरा असल्याचे कितीदा सांगायची गरज आहे? राजदने टाकलेल्या दबावामुळे तेजस्वी यांना विरोधकांच्या महाआघाडीने चेहरा बनवले. त्यांना प्रोजेक्ट केल्यास बिहारमधील जनतेला जंगलराज आठवेल याची जाणीव बहुधा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना असावी. त्यामुळे त्यांनी याआधी तेजस्वी यांचे नाव पुढे करण्याचे टाळले असावे, असे मिश्कील भाष्य त्यांनी केले.
बिहारमध्ये काही वर्षांपूर्वी राजदचे प्रमुख आणि तेजस्वी यांचे वडील लालूप्रसाद यादव यांची सत्ता होती. लालूंच्या राजवटीवर सातत्याने जंगलराज म्हणून टीका करण्यात आली. त्याचा संदर्भ चिराग यांनी दिला. चिराग यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) बिहारमधील सत्ताधारी एनडीएचा घटक आहे.





