न्यूयॉर्क : गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद काही केल्या संपत नाहीत. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या काही नागरिकांवर अमेरिका प्रवेशावर बंदी घालण्याची मोठी घोषणा केली. तसेच चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या गुंतवणुकीचे नियमदेखील अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकन काँग्रेसमध्ये चीनच्या विरोधात मोठी पावलं उचलण्यासाठी तयार करण्यात आलेलं विधेयक सादर करण्यात आलं होतं.
चीनच्या नव्या संरक्षण कायद्याच्याविरोधात हाँगकाँगसोबत विशेष ट्रेड डिल संपुष्टात आणणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. शुक्रवारी माध्यमांना संबोधित करताना त्यांनी या घोषणा केल्या. तसंच हाँगकाँगमधील प्रवसासाकरिता अमेरिकन नागरिकांसाठी एक नवी ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यामुळे चीनच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येक आहे.
संपूर्ण जगाला चीनकडून उत्तर हवं आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा करोनाला वुहान व्हायरस असे म्हटले. चीनने या व्हायरसची माहिती लपवल्यामुळेच तो संपूर्ण जगात पसरला. या व्हायरसमुळे अमेरिकेतील १ लाख लोकांचे प्राण गेले. तर जगभरातही लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले, असेही ट्रम्प म्हणाले. चीनने अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सची कमाई केली. परंतु आमच्याकडच्या लोकांना कधी नोकरी दिली नाही. चीनने जागतिक व्यापार संघटनेला दिलेल्या वचनबद्धतेचेही उल्लंघन केले, असेही त्यांनी नमूद केले. त्याबरोबरच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीन अवैधरित्या दावा करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. हे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी धोकादायक ठरू शकते. याव्यतिरिक्त चीननं हाँगकाँगबाबत दिलेले आश्वासनही तोडले, असे ट्रम्प म्हणाले.