मनिला (फिलिपीन्स) : दक्षिण चीन समुद्रात चीनच्या तटरक्षक दलाच्या बोटीने फिलिपीन्सच्या बोटीवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. पाण्याचे फवारे मारून या बोटीला धडक देखील दिली गेली. फिलिपीन्सच्या तटरक्षक दलाच्यावतीने ही माहिती देण्यात, आली. बीआरपी दातू पगबुआया ही फिलिपिनो बोट मासेमारीसाठी दक्षिण चीन समुद्रातील फिलिपीन्सच्या नियंत्रणाखालील थितु बेटाजवळ नांगर टाकून उभी असताना ही घटना घडली. चिनी तटरक्षक दल आणि संशयित मिलिशिया जहाजे अचानक जवळ आली. त्यांनी धोकादायक आणि चिथावणीखोरपणे फिलिपीन्सच्या बोटींवर पाण्याचे फवारे मारले आणि जहाजाला जवळून धडक दिली. त्यानंतर थोड्या मिनिटांनी फिलिपीन्सच्या मासेमारी करणाऱ्या बोटींनाही चीनच्या जहाजाने धडक दिली. चीनच्या बोटीच्या धडकेमध्ये फिलिपिनो बोटीतील कोणीही जखमी झाले नाही. चीनच्यावतीने या संदर्भात वारंवार विनंती केल्यानंतरही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. संपूर्ण दक्षिण समुद्रावर चीनने दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय लवादाने चीनच्या दाव्याला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण चीनने या आंतराष्ट्रीय लवादाचा निर्णय वारंवार फेटाळला आहे. आणि आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ फिलिपीन्सच्या बोटींवर वारंवार हल्ले केले जात आहेत.