चिंचवडला मैलामिश्रित पाणी थेट ‘पवना नदी’त
चिंचवड – तानाजीनगर, चिंचवड येथे ड्रेनेजलाईन फुटल्यामुळे अनेक दिवसांपासून मैलामिश्रित पाणी थेट पवना नदीत जात आहे. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. तर परिसरातील नागरिकांना साथीच्या आजाराचा धोका निर्माण झाला आहे.
तानाजीनगर, चिंचवड येथील परिसरात नदीकिनारी असलेली ड्रेनेजलाइन फुटली आहे. यामुळे हजारो लिटर मैला मिश्रित पाणी थेट पवना नदीपात्रात जात आहे. मैलामिश्रित पाणी हे जलपर्णी वाढण्यासाठी अत्यंत पोषक असल्याने काकडे पार्क ते लक्ष्मीनगर या परिसरात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे.
जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने ठेकेदार नियुक्त केला आहे. मात्र काकडे पार्क ते लक्ष्मीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली असूनही महापालिकेचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार येथील जलपर्णीकडे दुर्लक्ष करीत आहेत. एखादा मोठा पाऊस झाल्यावर येथील जलपर्णी वाहून जाईल आणि जलपर्णी काढल्याचे बील ठेकेदार घेईल, अशी चर्चा सुरू आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.





