संरक्षण : कॉग्निटिव्ह वॉरफेअर…

चीनचे ‘कॉग्निटिव्ह युद्ध’ हे भारतीय संस्थांवर, समाजावर एक व्यापक हल्ला आहे, ज्याचा उद्देश भारताला चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येऊ द्यायचे नाही.
चीन वेगळ्या प्रकारच्या युद्ध पद्धतीने तैवानवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये एक पद्धत आहे ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’. आजच्या युद्धक्षेत्रात, शस्त्रास्त्रांपेक्षा मनावर हल्ले करणारी शस्त्रे अधिक प्रभावी ठरत आहेत. या युद्धात, माहिती, विचार आणि भावना यांचा वापर करून समाजातील लोकांच्या विश्वासावर, निर्णयांवर आणि कृतींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यामध्ये एआयसारखे तंत्रज्ञान वापरून शत्रू राष्ट्राच्या मनावरती कब्जा करायचा, ज्यामुळे ते असे निर्णय घेतील की जे चीनच्या बाजूने असतील. म्हणजेच तैवानच्या मनावरती विजय मिळवून युद्ध न करता तैवानचे चीनमध्ये विलीनीकरण करायचे आहे.
कॉग्निटिव्ह वॉरफेअर (Cognitive Warfare) ही एक महत्त्वाची युद्ध पद्धती म्हणून पुढे येत आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी याचा वापर लँड वॉरफेअर, मेरीटाइम वॉरफेअर, सायबर वॉरफेअर, स्पेशल वॉरफेअर युद्धात करणार आहे.
शत्रू राष्ट्रांचा डेटा गोळा करणे
हे युद्ध लढण्याकरता चीन प्रचंड प्रमाणामध्ये शत्रू राष्ट्रांची माहिती, नेतृत्वाची पर्सनल इन्फॉर्मेशन, इतर डेटा हा साम, दंड भेद याचा वापर करून गोळा करत आहे. नंतर डेटा मायनिंग केले जाईल आणि मग त्यांचे विश्लेषण करून, नेमके कसे युद्ध लढायचे, हे ठरवले जाईल. चीनने अमेरिकेचा डेटा मोठ्या प्रमाणामध्ये गोळा केला आहे.
आपल्याच सैनिकांवरही वापर
चीन कॉग्निटिव्ह वॉरफेअरचा वापर आपल्या सैनिकांवरतीसुद्धा करत आहे. चीन संशोधन करत आहे की त्यांचे सैनिक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे वागतात/काम करतात. म्हणून चीन पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांच्या मनगटावरती स्मार्ट सेंसर ब्रेसलेट लावून महत्त्वाच्या सैनिकी नेतृत्वाची माहिती गोळा करत राहील म्हणजे त्यांचे हावभाव, मानसिकता, मनस्थिती वगैरे. यामुळे त्या सैनिकांचे स्ट्राँग पॉईंट्स आणि वीक पॉईंट्स युद्ध परिस्थितीमध्ये कळतील. ज्यामुळे योग्य सैनिक, योग्य कामा करता वापरणे हे चीनला सोपे जाईल. कारण लढाईचे सर्वात महत्त्वाचे तत्त्व असते ‘राइट मॅन, अॅट राइट प्लेस, ऍट राइट टाइम.’
विश्लेषण करून उपाययोजना
हाँगकाँग आणि तैवान ही एक प्रयोगशाळा आहे, जिथे चीन कॉग्निटिव्ह वॉरफेअर वापरत आहे. याशिवाय कॉग्निटिव्ह वॉरफेअरचा वापर चीन अमेरिका आणि युरोपच्या विरोधातसुद्धा करत आहे. याचा अभ्यास करून भारताने, चीन ही युद्ध पद्धती भारताविरुद्ध कशी वापरेल किंवा वापरत आहे याचे विश्लेषण करून उपाययोजना करायला पाहिजे.
भारताविरुद्ध कॉग्निटिव्ह युद्ध
चीन भारताच्याविरुद्ध कॉग्निटिव्ह युद्ध तंत्राचा वापर अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने करत आहे. या तंत्राचा उद्देश भारत सरकारची, जनतेची मानसिकता बदलणे, त्यांना गोंधळात टाकणे हा आहे. चीन या युद्धतंत्रामध्ये माहिती, प्रचार, मनोवैज्ञानिक तंत्रे आणि सायबर ऑपरेशन्सचा समावेश करून भारताच्या धोरणांवर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या कॉग्निटिव्ह युद्धाच्या धोरणांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे खाली दिले आहेत-
माहितीचे शस्त्रीकरण
चीन भारताविरुद्ध माहिती युद्ध तंत्राचा वापर करत आहे. भारताच्या जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचा वापर केला जातो. चीन खोटी माहिती, प्रोपोगंडा आणि खोट्या बातम्या पसरवून भारतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. जनमत बदलून चीन भारतीय समाजाचा देशावरील विश्वास कमी करण्याचे तंत्र वापरतो.
काही दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी विधान केले होते की, चीन भारताकरता एक मोठी समस्या आहे. या विधानावरती 9 सप्टेंबर रोजी चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने अग्रलेख लिहिला. डॉ. जयशंकर यांचे चीनच्या विरोधातील परराष्ट्र धोरण हे भारताकरता धोकेदायक आहे. त्याचा परिणाम भारताच्या राष्ट्रीय हितावरती होईल. हे धोरण अनेक भारतीयांना मान्य नाही, जे पूर्ण असत्य आहे. म्हणजेच ग्लोबल टाइम्स भारत सरकारमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
सायबर हल्ले आणि तंत्रज्ञान चोरणे
चीन सायबर हल्ल्यांद्वारे भारताच्या सरकारी, सैनिकी आणि आर्थिक संस्थांवर हल्ला करून गुप्त माहिती गोळा करत आहे. सायबर हल्ल्यांमुळे भारताच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो आणि त्यांच्या निर्णयक्षमतेला गोंधळात टाकले जाते. तंत्रज्ञान चोरणे हे देखील कॉग्निटिव्ह युद्धाचे महत्त्वाचे अंग आहे, ज्याद्वारे चीन भारताच्या विकास धोरणांवर थेट परिणाम करतो.
मनोवैज्ञानिक ऑपरेशन्स
चीन भारतीय राजकीय आणि सामाजिक स्थैर्यावर परिणाम करण्यासाठी मनोवैज्ञानिक ऑपरेशन्सचा वापर करतो. चीनच्या प्रचारयंत्रणा भारताच्या समाजातील वांशिक, धार्मिक आणि सामाजिक संघर्षांना चालना देत आहे. अशा प्रकारे भारतात अंतर्गत संघर्ष आणि असंतोष निर्माण करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे.
संस्कृतीचे प्रभावशाली शस्त्र
चीन सॉफ्ट पॉवर धोरणाचा वापर करून भारतीय विचारांवर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून चीन भारताच्या शैक्षणिक संस्था आणि विचारसरणींवर प्रभाव टाकतो.
प्रोपोगंडा आणि माध्यमांवर नियंत्रण
चीन आपले राष्ट्रहित सुरक्षित ठेवण्यासाठी जागतिक माध्यमांवर नियंत्रण ठेवतो आणि त्याद्वारे भारताच्या विरुद्ध चांगली आणि प्रभावी कथा मांडण्याचा प्रयत्न करतो. माध्यमांद्वारे चीनची बाजू अधिक सकारात्मक तर भारताची बाजू नकारात्मक दाखवली जाते.
वैज्ञानिक सहकार्य आणि डेटा चोरी
चीन भारताच्या वैज्ञानिक समुदायाशी सहकार्य वाढवून गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये संशोधन संस्थांचा गोपनीय डेटा चोरणे, तंत्रज्ञान हस्तगत करणे आणि भारताच्या धोरणात्मक योजना धोक्यात आणणे यांचा समावेश होतो. चीन प्रचंड वेगाने या विषयावरती काम करत आहे आणि भारतानेसुद्धा कॉग्निटिव्ह वॉरफेअर या क्षेत्रात संशोधन करून आपली लढण्याची क्षमता वाढवली पाहिजे. याकरता आपले शास्त्रज्ञ, प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर आणि सगळ्याच्या ज्ञानाचा वापर करून या क्षेत्रामध्ये प्रगती करावी लागेल.





