‘चीनला याचे परिणाम भोगावे लागतील…’; रशिया-चीन जवळीकीमुळे ज्यो बायडेन यांचा इशारा

Joe Biden | China | Russia – युक्रेन विरोधातील युध्दात रशियाला केल्या जात असलेल्या मदतीबद्दल अमेरिका चीनवर भडकली असून चीनला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले की, रशियाला साथ दिली तर त्याची आपल्याला किंमत चुकवावी लागेल हे चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांना समजून घ्यावे लागेल.
तसेच बायडेन असेही म्हणाले की. पश्चिमेकडे एका नव्या औद्योगिक धोरणाची आवश्यकता आहे. युरोपीय संघ आणि नाटोनेही स्वत: दारूगोळा निर्मितीची क्षमता निर्माण करण्यासाठी सक्षम होणे गरजेचे आहे.
दरम्यान, बायडेन जरी डेमोक्रॅटीक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असले तरी त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची एका कार्यक्रमात प्रशंसा केली. कमला हॅरिस अमेरिकेचे नेतृत्व करण्यासाठी योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष होण्यासाठी बायडेन सक्षम आहेत का याबाबत त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांकडून शंका उपस्थित केली जात आहे. तसेच अध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांच्याही नावाची चाचपणी सुरू असल्याच्या बातम्या कानावर येत आहेत असे असताना बायडेन यांनीच अध्यक्षपदासाठी कमला हॅरिस योग्य असल्याचे विधान केल्यामुळे भुवया उंचावल्या आहेत.
एका पत्रकार परिषदेत बोलताना बायडेन म्हणाले की, कमला हॅरिस सक्षम आहेत याबाबत कोणतीही शंका नाही व त्यामुळेच आपण त्यांची निवड केली आहे. यामागची कारणे काय असे बायडेन यांना विचारल्यावर ते म्हणाले की ज्या प्रकारे कमला हॅरिस यांनी महिलांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा हाताळला आहे त्यावर नियंत्रण ठेवले आहे तसेच जवळपास सगळेच मुद्दे हाताळण्याची त्यांची जी क्षमता आहे ती उत्तम आहे.
मात्र याच पत्रकार परिषदेत बायडेन यांच्याकडून पुन्हा एकदा गल्लत झाली. त्यांनी चुकून कमला हॅरिस यांचा उल्लेख ट्रम्प असा केला. जर त्या राष्ट्रपती बनण्यासाठी योग्य नाही असे मला वाटले असते तर मी उपराष्ट्रपती पदासाठी ट्रम्प यांची निवड केली नसते असा उल्लेख त्यांनी अनावधानाने केला.
बायडेन यांच्याकडून काही दिवसांपूर्वीही अशीच मोठी चूक झाली. त्यावेळी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्सकी यांना त्यांनी पुतीन असे संबोधले होते. मात्र चूक लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच त्यात दुरूस्ती केली आणि तुम्ही (झेलेन्सकी) त्यांच्यापेक्षा (पुतीन) खूप चांगले आहात असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.





