बीजिंग – पाकिस्तानमध्ये चीनच्या मदतीने बांधण्यात येत असलेल्या धरणाचे काम वेगाने पुर्ण करण्यात येणार आहे, असे चीनच्यावतीने आज जाहीर करण्यात आले. भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९६० साली झालेला सिंधू जल करार भारताने स्थगित केल्याच्या पार्श्वभुमीवर चीनकडून या धरणाचे बांधकाम वेगाने करण्यात येणार आहे, चायना एनर्जी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनच्यावतीने वायव्य पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मोहमंद जलविद्युत प्रकल्पावर २०१९ पासून काम करत आहे. नियोजनानुसार हा प्रकल्प पुढील वर्षी पुर्ण होणे अपेक्षित होते. धरणावरील काँक्रीट भरण्याचे काम सुरू झाले असून कामाचा हा टप्पा पाकिस्तानच्या या प्रमुख राष्ट्रीय प्रकल्पासाठी एक महत्त्वाचा बांधकाम टप्पा आहे, असे चीन सरकारची सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या सीसीटिव्हीने म्हटले आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यीमवू सोमवारी चीनच्या वरिष्ठ राजदूत वांग यी यांच्याशी चर्चा केली. त्या पार्श्वभुमीवर पाऊल उचलण्यात आले आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मोहमंद धरण हे वीज निर्मिती, पूर नियंत्रण, सिंचन आणि पाणी पुरवठ्यासाठी बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून नियोजित आहे. येथील जलविद्युत प्रकल्पातून अंदाजे ८०० मेगावॅट जलविद्युत निर्मिती आणि खैबर पख्तूनख्वाची राजधानी पेशावरला दररोज ३०० दशलक्ष गॅलन पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी हे धरण बांधण्यात येत आहे. सिंधू पाणी करारानुसार, पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी मिळते. तर भारताला पूर्वेकडील रावी, सतलज आणि बियास नद्यांचे पाणी वापरण्याचा अधिकार आहे. पाकिस्तानला होणाऱ्या पिण्याच्या आणि सिंचन पुरवठ्यापैकी सुमारे ८० टक्के पाणी या नद्यांमधून येते.