Satara | राजाचे कुर्ले येथे बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात

पुसेसावळी (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथे ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या निनादात प्राथमिक शाळेतील बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला.ग्रामस्थ व पालकांच्या सहभागाने या सोहळ्यात रंगत आली होती.
प्राथमिक शाळेपासून सगळ्या गावात माऊलींचा जयघोष सुरु होता. गावात ठिकठिकाणी महिलांनी पालखीचे पूजन करत चिमुकल्यांचे औक्षण केले. प्रारंभी पालखीचे पूजन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा दीपाली माने यांनी केले.
यावेळी ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समितीचे आजी-माजी पदाधिकारी,ग्रामस्थ,पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका मनिषा आपटे, मिनाक्षी माने, संदीप घार्गे, अनिता खाडे यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, महिलांनी व विद्यार्थीनींनी फुगडीचा फेर धरत या सोहळ्याचा आनंद लुटला. पंढरीला न जाता या चिमुकल्यांच्या रुपातच आम्हाला पांडुरंगाचे दर्शन झाले अशा प्रतिक्रिया वृद्ध महिला,पुरुषांनी व्यक्त केल्या.





