Child Thrown in Well – भांबर्डे (ता. शिरूर) येथे एका निष्ठूर महिलेने स्वतः अकरा महिन्यांच्या चिमुरड्याला विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ८ मार्च रोजी पूजा पवार ही महिला आपल्या अकरा महिन्यांच्या यश या बाळासह बेपत्ता झाली होती. पती रवींद्र पवार यांनी शोध घेतला असता, पूजा जांबूत येथील एका महिलेच्या घरी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने बाळाला विहिरीत टाकल्याची कबुली दिली. पूजाने पोलिसांना सांगितले की, ८ मार्च रोजी यश ओट्यावरून खाली पडल्याने त्याची हालचाल बंद झाली होती. घाबरलेल्या अवस्थेत तिने बाळाला कपड्याच्या बॅगेत भरून घराशेजारील विहिरीत फेकून दिले. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला असता, अकरा महिन्यांच्या यशचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. याप्रकरणी रवींद्र पवार यांनी दिलेल्या खबरीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पूजाला ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अकरा महिन्यांच्या बाळाचा खून? भांबर्डे येथील या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. बाळाचा मृत्यू नेमका कसा झाला? हा खून आहे की अपघात? याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही शोध घेतला जात असून, लवकरच सत्य समोर येईल. गुन्हा वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, बाळाला विहिरीत टाकल्यानंतर पूजाने आळंदी येथे जाऊन एका तरुणाशी विवाह केला होता. यामध्ये एका एजंटचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासात या महिलेचे यापूर्वी तीन विवाह झाले असल्याचे उघड झाल्याने हा गुन्हा आता वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. जागतिक महिला दिनी माणुसकीला काळीमा विशेष म्हणजे, ८ मार्च रोजी संपूर्ण जग ‘जागतिक महिला दिन’ साजरा करत असताना, पूजा पवार हिने आपल्या पोटच्या बाळाला बॅगेत भरून विहिरीत फेकून दिले. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.