Child Safety Alert: पालकांनो सावधान! शिंदेवाडीत ‘चॉकलेट’ देऊन मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न? परिसरात मोठी खळबळ
Child Safety Alert : मुळशी तालुक्यातील शिंदेवाडी परिसरात अनोळखी व्यक्तींकडून मुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची भीती; पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन.

Child Safety Alert – मुळशी तालुक्यातील शिंदेवाडी परिसरात मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढवणारा एक संशयास्पद प्रकार समोर आला असून, पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. शाळेतून किंवा इतर ठिकाणाहून एकटे ये-जा करणार्या मुलांशी काही अनोळखी व्यक्ती संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. एका अनोळखी महिलेने मुलांशी पत्ता विचारण्याच्या किंवा इतर कारणांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर काही वेळातच दुचाकीवरून तोंड बांधलेल्या तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी येऊन मुलांना चॉकलेट, कॅडबरी किंवा इतर वस्तूंचे आमिष दाखवत बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असून परिसरात सतर्कता वाढविण्याची मागणी केली आहे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालकांनी आपल्या मुलांना अनोळखी व्यक्तींशी संवाद साधू नये, कोणाकडूनही खाऊ किंवा भेटवस्तू स्वीकारू नयेत तसेच कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास त्वरित पालक, शिक्षक किंवा पोलिसांना कळवावे, अशा सूचना देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. बालसुरक्षा तज्ज्ञांच्या मते, अशा प्रसंगी मुलांनी घाबरून न जाता मोठ्याने ओरडून मदत मागावी, जवळच्या दुकानात किंवा गर्दीच्या ठिकाणी जावे आणि स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित करावी. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद प्रकारांची खात्रीशीर माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी
शिंदेवाडी परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा, बसथांबे, सार्वजनिक ठिकाणे आणि गर्दीच्या भागांमध्ये सायंकाळच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, तसेच संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पौड पोलिसांकडे केली आहे. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





