Nashik News : चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरण: नाशिकमध्ये ३५७ जणांवर सायबर गुन्हे दाखल

Nashik – सायबर गुन्ह्यांमधील विविध घटना आणि तक्रारी सायबर पोलिसांपर्यंत पोहोचतात. मात्र, थेट मेटा कंपनीकडून केंद्र सरकारला वेगवेगळ्या राज्यांमधील चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती पुरवण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक सायबर पोलीसांनी नाशिकमध्ये एकूण 357 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. नाशिक सायबर पोलीस चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी गांभीर्याने तपास करत आहेत.
लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट्सद्वारे स्वतःच्या प्रोफाइल वरून प्रसारित केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहे. राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या टीप लाईनमधील माहितीच्या आधारे सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. चाईल्ड पॉर्नोग्राफी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो.
अल्पवयीन मुलामुलींची अश्लील छायाचित्र किंवा व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केल्यास किंवा डाऊनलोड केल्यास ही कृत्य चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या प्रकारात समाविष्ट होतात. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईटवर स्वतःच्या प्रोफाइलवरून वेगवेगळ्या ठिकाणी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा इंटरनेट आयपी ऍड्रेस वरून प्रसारित केल्या जातात.
मेटा कंपनीकडून भारत सरकारला वेगवेगळ्या राज्यांमधील अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या विकृतींची माहिती पुरवण्यात आली आहे. त्यानंतर आता नाशिक सायबर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.





