Child Nutrition: नवजात बालकासाठी आयुष्याची सुरुवात आईच्या दुधापासूनच होते. जन्मानंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिले पूर्ण सहा महिने बाळासाठी फक्त आईचे दूधच सर्वोत्तम आणि पूर्णान्न मानले जाते. पूर्वी चार महिन्यांपासून वरचा आहार सुरू करण्याची पद्धत होती, पण आता तज्ज्ञांच्या मते सहा महिन्यांनंतरच घन आहार द्यावा. आईने या काळात स्वतःचा आहार चौरस आणि पौष्टिक ठेवणे आवश्यक आहे. आईचा आहार चांगला असेल तर दुधाचा दर्जा उत्तम राहतो आणि बाळाचे पोषण योग्य प्रकारे होते. त्यामुळे बाळ बाळसेदार वाढते आणि आईचे वजनही नियंत्रणात राहते. पहिले सहा महिने फक्त स्तनपान केल्याने बाळाच्या शरीरातील चरबीच्या पेशी नियंत्रित राहतात. जर लवकर वरचा आहार सुरू केला, तर पुढे लठ्ठपणाचा धोका वाढतो. लहान वयातच जाडी वाढल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. सहा महिन्यांनंतर दिवसातून दोन वेळा वरचा आहार सुरू करता येतो. पाणी उकळून थंड करून द्यावे. फळांचे रस देताना संत्री, मोसंबी, आवळा, ऊसाचा रस किंवा शहाळ्याचे पाणी द्यावे. तंतुमय फळे थेट खायला द्यावीत. दर आठवड्याला एक नवीन पदार्थ देत हळूहळू चवींची सवय लावावी. आंबट, गोड, खारट अशा सर्व चवींचा अनुभव मुलाला द्यावा. वर्षभरात बाळाला वरणभात, पातळ पेज, सूप, रवा, तांदळाची खीर, पोळी, उपमा, पोहे, थालीपीठ असे पदार्थ देता येतात. एक वर्षानंतर मुलाने स्वतःच्या हाताने खाण्याची सवय लावावी. सांडेल म्हणून भरवू नये. स्वतः खाल्ल्याने मेंदूला भूक भागल्याचा संकेत योग्य मिळतो. चमच्याने खाण्यापेक्षा हाताने खाणे अधिक चांगले. Child nutrition पिझ्झा, बर्गर, बिस्किटे, केक, टोस्ट, चॉकलेट आणि शीतपेये यांची सवय लावू नये. साखर, बोर्नव्हिटा, कॉम्प्लान यांची गरज नाही. दुधात नैसर्गिक लॅक्टोज साखर असतेच. साखरेऐवजी गूळ वापरणे उत्तम. दूध शक्यतो नैसर्गिक असावे. देशी गाईचे दूध उत्तम; नसेल तर म्हशीचे दूध साय काढून वापरावे. रोज किमान दोन कप दूध मुलाला द्यावे. थालीपीठ हा अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे. भाजणी करून त्यात कांदा, भोपळा, पालक, मेथी, शेवगा, तीळ, ओवा घालून विविध प्रकार करता येतात. त्यासोबत दही किंवा नारळाची चटणी देता येते. घरचे पदार्थच मुलांसाठी सर्वोत्तम आहेत. दोन वर्षांपर्यंत हळूहळू स्तनपान कमी करून पूर्ण घन आहार सुरू करावा. वाढत्या वयानुसार लोह, कॅलरीज आणि पोषक घटक आहारातून मिळणे गरजेचे आहे. जन्माच्या वेळी असलेले वजन चार महिन्यांत दुप्पट आणि वर्षभरात तिप्पट होते, ही वाढ योग्य आहाराचे लक्षण आहे. मुलांना दिवसातून पाच ते सहा वेळा थोड्या प्रमाणात आहार द्यावा. एकदम जास्त खायला भाग पाडू नये. योग्य वयात योग्य आहार दिल्यास बाळ निरोगी, सशक्त आणि बुद्धिमान वाढते.