Rani Mukerji: दीपिका पदुकोणने ८ तासांच्या शिफ्टची मागणी केल्यानंतर अभिनेत्री राणी मुखर्जीनेही आपला अनुभव शेअर केला आहे. राणीने सांगितले की जेव्हा ती ‘हिचकी’ चित्रपट करत होती, तेव्हा तिची मुलगी आदिरा फक्त १४ महिन्यांची होती आणि ती ब्रेस्टफीडिंग करत होती. त्यामुळे ती शूटिंगला जाण्यापूर्वी सकाळी दूध पंप करून जायची. राणीने सांगितले, “मी ज्या कॉलेजमध्ये शूट करत होते, ते घरापासून ट्रॅफिकमुळे जवळपास दोन तासांवर होते. त्यामुळे मी सकाळी ६.३० वाजता घरून निघायचे आणि ८ वाजता पहिला शॉट द्यायचे. माझं शूट दुपारी १२.३०-१ वाजेपर्यंत पूर्ण व्हायचं. डायरेक्टर आणि युनिट फार नियोजनबद्ध होते, त्यामुळे ६-७ तासांत शूट संपायचं आणि मी दुपारी ३ वाजेपर्यंत घरी परत यायचे.” ८ तासांच्या शिफ्टबाबत राणी म्हणाली, “आज या विषयावर चर्चा होत आहे कारण लोक बोलत आहेत. पण हे सर्व प्रोफेशन्समध्ये घडतं. मीही काही तासांचे शूट केले आहे. जर प्रोड्युसरला काही हरकत नसेल तर काम होतं. पण जर त्याला ते मान्य नसेल तर कलाकार प्रोजेक्टमधून बाहेर पडतो. कुणावर काही थोपवलं जात नाही.” तिने आपल्या लग्नाबाबतही सांगितले. “माझे पती आदित्य चोप्रा खूप प्रायव्हेट व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांनी लग्नही प्रायव्हेट ठेवलं. आमच्या लग्नाचे फोटो पब्लिकमध्ये का आले नाहीत याचे कारणही हेच आहे. मी स्वतःही वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमी प्रायव्हेट राहिली आहे. मी फक्त तेव्हाच बोलते किंवा समोर येते, जेव्हा त्याची खरोखर गरज असते.”