डेंग्यूसह चिकनगुनिया, मलेरियाचे थैमान

जानेवारीपासून ते आतापर्यंत 1 हजार 95 रुग्णांना डेंग्यूची लागण
पुणे – हवामानातील सततच्या बदलामुळे शहरात डेंग्यूसह चिकनगुनिया आणि मलेरियाच्या आजाराने थैमान घातले आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी इतर आजारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.
जानेवारी ते आतापर्यंत 1 हजार 95 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली तर, 5 हजार 143 रूग्ण संशयित आढळून आले आहेत, तसेच चिकनगुणियाचे आतापर्यंत 558 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. डेंग्यूचे रुग्ण वाढण्यास सध्याचे हवामान कारणीभूत ठरत असून, नुकत्याच झालेल्या पावसामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात 465 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली तर, 1 हजार 587 रुग्ण हे संशयीत म्हणून आढळले आहेत. डेंग्यूच्या आजाराला पोषक वातावरण तयार झाले असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
डासांच्या उत्पत्तीची दोन हजार ठिकाणे आढळली
डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि इतर आस्थापनांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात येते. या तपासणीत जानेवारीपासून ते आजपर्यंत डासांच्या उत्पत्तीची 2 हजार 203 ठिकाणे आढळली असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, तसेच दखल न घेणाऱ्या आस्थापनांकडून आतापर्यंत 2 लाख 79 हजार 701 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. नोव्हेंबरपासून डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण कमी होईल. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहराच्या विविध भागांतील सर्वेक्षणांतर्गत डासांच्या उत्पत्तीची स्थाने शोधून ती नष्ट करण्यासाठी ठिकठिकाणी धूरफवारणी, जनजागृती, दंडात्मक कारवाई, औषधफवारणी आदी उपक्रम सुरू आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
– डॉ. सजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.





