माजी मुख्यमंत्री सुपुत्र वैभव गेहलोतांची लोकसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी ! ‘या’ मतदार संघात दौरे वाढल्याने चर्चांना उधाण

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राजस्थानात सगळ्यांत जास्त चर्चा माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव यांच्या नावाची होते आहे. अगोदर वैभव यांना जोधपूर येथून रिंगणात उतरवले जाणार असल्याची चर्चा होत होती.
मात्र भारतीय जनता पार्टीने येथून केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना उमेदवारी दिली असल्यामुळे वैभव यांची गाडी आता जालोरकडे वळवण्यात आली असून गेल्या काही दिवसांत त्यांचे या भागातील दौरे अचानक वाढले आहेत.
स्वत: अशोक गेहलोत यांनीही काही बैठका घेऊन जालोरच्या जागेचा आढावा घेतला आहे. येथे माळी समाजाच्या मतांचे प्राबल्य आहे. त्यामुळे या समाजाची मते एकत्रित करण्याची तयारी केली जाते आहे. जालोर लोकसभा मतदार संघात आठ विधानसभा मतदार संघ आहेत. यातील एका ठिकाणी अपक्ष आमदार आहेत. तर चार ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयी झाले आहेत. तीन जागा कॉंग्रेसकडे आहेत. येथील देवासी, कल्वी आणि माळ्यांची मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून सुरू आहे.
दरम्यान, वैभव यांचे सातत्याने जालोर आणि सिरोही येथे दौरे सुरू आहेत. त्यांच्याकडून या भागातल्या भेटीगाठींचे आणि स्थानिक विषयांचे ट्वीटही केले जात असल्यामुळे त्यांच्या रिंगणात उतरण्याच्या कयासांना पुष्टीच मिळाली आहे.





