सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; हजारो तरुणांना मिळणार रोजगार?

सोलापूर : सोलापूरच्या औद्योगिक आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारण्यात येणार असून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने योग्य जागा निश्चित केल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याच्या माध्यमातून आयटी पार्क उभारला जाईल आणि आयटी कंपन्यांना येथे आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थे अंतर्गत १,१२८ आणि शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत २२०, अशा एकूण १,३४८ सदनिकांच्या वितरणप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोल्ट होते, यावेळी ही घोषणा केली.
या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप सोपल, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, अभिजित पाटील, देवेंद्र कोठे आणि मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते.
सोलापूरचा सर्वांगीण विकास
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सोलापूरमध्ये बंद जलवाहिनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. सांडपाणी प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न सोडवण्यात आला असून, हे काम सुरू झाले आहे. शहरातील जलवितरण वाहिनीसाठी ८५० कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सोलापूरकरांना दररोज शुद्ध पाणी मिळेल. तसेच, विमानतळाच्या अतिरिक्त कामालाही लवकरच सुरुवात होईल, असं फडणवीस म्हणाले.
प्रधानमंत्री आवास योजना: ४८,००० घरांचे नियोजन
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूरमध्ये ४८,००० कुटुंबांना हक्काचे घर देण्याचे नियोजन आहे. यापैकी २५,००० घरांचे काम पूर्ण झाले असून, २०,००० घरांचे वितरण पूर्ण झाले आहे. उर्वरित घरांचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १,००० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
आयटी पार्कमुळे सोलापूरचे भविष्य उज्ज्वल
सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी आयटी पार्क ही मोठी संधी ठरणार आहे. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल आणि शहरात आयटी उद्योगांचा विकास होईल. यासह, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सोलापूर आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरच्या विकासाला प्राधान्य देत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.





