Pimpri : प्रमुख न्यायाधीशांनी केली इमारतीची पाहणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड न्यायालयाला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर मिळणार आहेत. अलिकडेच या न्यायालयांना मान्यता मिळाली आहे. यानंतर ही दोन महत्त्वाची न्यायालये शहरात सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. अलिकडेच पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश एम. के. महाजन, त्यासोबतच जिल्हा न्यायाधीश शिंदे व वाघमारे या न्यायाधीशांनी मोरवाडी येथील न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली आहे.
पूर्वी मोरवाडी येथील इमारतीतूनच न्यायालयांचे कामकाज चालत होते. त्यानंतर जागा कमी पडत असल्याने शहरातील न्यायालये नेहरुनगर येथे स्थलांतरित करण्यात आली. ही इमारत अद्यापही न्यायालयाकडेच असल्याने येथेच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. त्या अनुषंगाने न्यायाधीशांनी येथे पाहणी केली. यावेळी न्यायाधीशांनी न्यायालयीन प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, महापालिका अधिकारी व पिंपरी-चिंचवड अॅड. बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत चर्चा केली. तसेच आवश्यक सूचना केल्या.
पिंपरी चिंचवड शहरासाठीच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इमारतीची पाहणी करत न्यायालय लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने न्यायालयीन इमारतीची डागडुजी, रंगरंगोटी व इतर स्थापत्य संबंधित कामे त्वरित पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
यावेळी पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश चव्हाण तसेच इतर न्यायाधीश अमुदी, गायकवाड उपस्िथत होते. पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रिना मगदूम यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी तसेच वकील बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





