नवी दिल्ली – भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआयची कोठडी सुनावण्यत आली आहे. “आयएनएक्स मिडीया’च्या भ्रष्टाचार प्रकरणातील वस्तुस्थिती आणि तथ्य पाहता चिदंबरम यांना पोलिस कोठडी दिली जाणे योग्यच आहे, असे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी म्हटले आहे. 26 ऑगस्टपर्यंतच्या कोठडीदरम्यान नियमाप्रमाणे चिदंबरम यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाईल. तसेच त्यांचे कुटुंबीय आणि वकिल दररोज अर्ध्यातासासाठी त्यांना भेटू शकतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये आज चिदंबरम यांना न्यायालयात आणले गेले. ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू न्यायालयात मांडली. या प्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्यासह सर्व आरोपींना जामीन मिळाला आहे. सर्वात पहिल्यांदा अटक झालेले कार्ती यांचे चार्टर्ड अकाउंटंट भास्कर रमण यांच्यासह इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांना या प्रकरणी जामीन मिळाला आहे. मुखर्जी दाम्पत्य हत्येच्या अन्य प्रकरणात तुरुंगात आहेत. “एफआयपीबी’ची मंजूरी देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक झालेली नाही, याकडे चिदंबरम यांच्या वकिलांनी लक्ष वेधले.
मात्र मोठे कारस्थान उघड करून प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी चिदंबरम यांची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे सीबीआयच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले. सीबीआय चिदंबरम यांच्याकडून बळजबरीने कबुलीजबाब मिळवणार नाही. मात्र प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा सीबीआयला अधिकार आहे. चिदंबरम यांनी अतापर्यंत तपासास सहकार्य केलेले नाही. या प्रकरणातील काही तथ्ये कोर्टात उघडपणे सांगितली जाऊ शकणार नाहीत, असेही ऍड. मेहता म्हणाले.
चिदंबरम पळून जाणार नाहीत. हे संपूर्ण प्रकरण इंद्राणी मुखर्जीच्या जबाबावर आधारलेले आहे, असे ऍड. अभिषेक सिंघवी यांनी सांगितले. पोलिस कोठडी केवळ विशेष प्रकरणात आवश्यक असते. तसेच या प्रकरणात नवीन काहीच घडलेले नाही, असेही ऍड. सिंघवी म्हणाले. मात्र कोर्टापुढे सर्वजण समान आहेत. अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल्यानंतरच चिदंबरम यांना अटक झाली आहे, असे सांगून सीबीआयने या दाव्याला विरोध केला.
चिदंबरम यांच्यावतीने आणि त्यांच्याविरोधातील दोन्ही बाजूंचा युक्तीवाद न्यायालयाने अर्धातास ऐकून घेतला आणि चिदंबरम यांना 4 दिवसांची कोठडी सुनावली. कोठडी सुनावली गेल्यानंतर लगेचच सीबीआयच्या पथकाने चिदंबरम यांना न्यायालयातून बाहेर नेले.