छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

नवी दिल्ली – छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले ते 74 वर्षांचे होते. गेल्या तीन आठवड्यांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना दोनदा हृदयविकाराचे धक्के बसले होते. सन 2000 साली छत्तीसगड या राज्याची स्थापना झाल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून या राज्याचा कारभार स्वीकारला होता. त्यांनी सन 2016 मध्ये कॉंग्रेसला रामराम ठोकून आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. जनता कॉंग्रेस छत्तीसगड असे त्यांच्या पक्षाचे नाव होते. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी या पक्षातर्फे अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले होते पण या निवडणुकीत त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नव्हता.
मूळचे मेकॅनिकल इंजिनिअर असलेले जोगी यांनी आएएस आणि आयपीएस या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षाही उत्तीर्ण केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. महासमुंद मतदारसंघातून ते सन 2004 मध्ये लोकसभेवरही विजयी झाले होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना लाभली होती.





