छत्तीसगडच्या 4 जिल्ह्यांमध्ये 1000 जवानांची मोठी कारवाई ; 4 नक्षलवादी ठार, तर DRG चा एक जवान शहीद

Chhattisgarh Anti-Naxal Operation। छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवरील अबुझमदच्या जंगलात शनिवारी रात्री उशिरापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. याविषयी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. त्यांनी याविषयी, “३ जानेवारीला नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्यातील डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त पथके अबुझमद भागासाठी रवाना झाली होती. 4 जानेवारीच्या संध्याकाळी अबुझमदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आणि दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत ४ नक्षलांचा खात्मा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यासोबतच या कारवाईत DRG चा एक जवान शहीद झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
AK 47, SLR सारखी शस्त्रे जप्त Chhattisgarh Anti-Naxal Operation।
बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी या सर्व कारवाईची माहिती दिली. त्यांनी जवानांच्या कारवाईवर बोलताना, “जंगलात शोध मोहिमेदरम्यान आतापर्यंत 4 गणवेशधारी नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांच्याकडून एके ४७ आणि एसएलआर सारखी स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत दंतेवाडा डीआरजी जवान हेड कॉन्स्टेबल सन्नू करम हे शहीद झाले. सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे. दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि बस्तर जिल्ह्यातील 1 हजार DRG आणि STF जवानांनी शनिवारी नक्षलवाद्यांच्या मुख्य भागाला वेढा घातला होता. दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू होता. जवान अजूनही घटनास्थळी हजर आहेत. दरम्यान , या चकमकीत जिल्हा राखीव रक्षक (DRG) चे हेड कॉन्स्टेबल सन्नू करम देखील शहीद झाल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्र्यांकडून जवानांचे कौतुक Chhattisgarh Anti-Naxal Operation।
दरम्यान, गेल्या दीड वर्षात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या कालावधीत 300 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत, सुमारे 1000 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून 837 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य 2026 पर्यंत नक्षलमुक्त होईल, असा दावा केला होता. छत्तीसगड पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्या परिश्रम, समर्पण आणि शौर्याचे कौतुक केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, ‘मी छत्तीसगडच्या जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की तुम्ही मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे आणि आम्ही सर्वजण 2026 पर्यंत राज्यातून नक्षलवाद संपवण्यासाठी कटिबद्ध आहोत. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की छत्तीसगड पोलीस हे देशातील सर्वात धाडसी पोलीस दलांपैकी एक आहे. छत्तीसगडने त्याच्या स्थापनेच्या 25 व्या वर्षात प्रवेश केल्यामुळे, राज्य पोलिसांना राष्ट्रपतींच्या रंगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सैनिकांचे परिश्रम, समर्पण, शौर्य आणि लोकांवरील त्यांच्या प्रेमाचा हा दाखला आहे.





