“छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले म्हणजे, मराठा स्थापत्यशास्त्राचे अद्वितीय वैशिष्ट्य” – पंतप्रधान मोदी

Chhatrapati Shivaji Maharaj । Prime Minister Modi – भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या मराठा सैन्य लँडस्केप्सला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे.
या ऐतिहासिक यशामुळे मराठा साम्राज्याच्या रणनीतिक, स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करत सर्व नागरिकांना या किल्ल्यांना भेट देण्याचे आवाहन केले आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, मराठा साम्राज्याचा उल्लेख होताच सुशासन, सैन्यशक्ती, सांस्कृतिक गौरव आणि सामाजिक कल्याणाचा आदर्श डोळ्यासमोर येतो. या महान शासकांनी अन्यायाविरुद्ध न झुकण्याची प्रेरणा आपल्याला दिली आहे.
त्यांनी 2014 मध्ये रायगड किल्ल्याला दिलेल्या भेटीची आठवण सांगताना म्हटले, रायगडावरील ती भेट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाली. त्यांनी सर्व नागरिकांना या किल्ल्यांना भेट देऊन मराठा इतिहासाची माहिती घेण्याचे आवाहन केले.
या यशामागे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे एकत्रित प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. पंतप्रधान मोदी यांच्या पाठिंब्याने आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण तसेच संस्कृती मंत्रालयाच्या सहभागाने हा टप्पा गाठता आला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशासाठी पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी यांचे आभार मानले.
मराठा स्थापत्यशास्त्राचे अद्वितीय वैशिष्ट्य
मराठा किल्ल्यांचे स्थापत्य हे त्यांच्या रणनीतिक आणि अभेद्य डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे बांधकाम हे मराठा साम्राज्याच्या युद्धकौशल्याचा आणि मुत्सद्देगिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. या किल्ल्यांनी स्वराज्याच्या निर्मिती आणि संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली.
युनेस्कोच्या मान्यतेमुळे या स्थापत्यशास्त्राला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. या युनेस्को मान्यतेमुळे मराठा इतिहासाला जागतिक व्यासपीठावर नवा गौरव प्राप्त झाला आहे. यामुळे पर्यटन, इतिहास संशोधन आणि सांस्कृतिक जतनाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.





