पुणे – स्वराज्य रक्षणासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा समावेश महापुरुषांच्या यादीत करावा. तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये त्यांची प्रतिमा लावण्यात यावी, अशी मागणी कसबा विधानसभा मतदारसंघांचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत केली.
पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे धंगेकर यांनी या विषयाकडे लक्ष वेधले. “मराठा महासंघाने याबाबतची मागणी यापूर्वी केली आहे. ती तत्काळ पूर्ण करावी. शाळा, महाविद्यालये ही संस्काराची केंद्रे असतात. तेथे छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा लावल्यास देशप्रेम आणि देशासाठी पराक्रमाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचेल. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना यातून योग्य संदेश मिळत राहील,’ असे धंगेकर यांनी यावेळी म्हटले.