Chhatrapati Sambhajinagar: शहरात सुरू असलेल्या महापालिका निवडणूक प्रक्रियेदरम्यान आज (दि. १६) सकाळी मोठा गोंधळ उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील मतदान व मतमोजणी केंद्रांवर उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यावरून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या वादातून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवाराच्या प्रतिनिधीला मतदान केंद्रात प्रवेश देण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर वादाला तोंड फुटले. वाद वाढताच पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) चे काही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. विकास जैन हे मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांचे नाव असून त्यांच्यासह तीन ते चार शिवसेना कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसून येत आहेत. या घटनेदरम्यान माजी महापौर विकास जैन यांनाही बेदम मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत असून ते जखमी अवस्थेत आढळून आले. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यात कार्यकर्त्यांच्या किंकाळ्या, आरोळ्या आणि आक्रोश ऐकू येत आहेत. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र टीका होत आहे. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस केली आणि पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. “लोकशाही प्रक्रियेदरम्यान अशा प्रकारची मारहाण कदापि स्वीकारार्ह नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून दोषी पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरातील विविध भागात तणावाचे वातावरण असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.