Chhatrapati Sambhajinagar : गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण; छ. संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगर : मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात काही केअरटेकर आणि शिपाई यांनी मतिमंद विद्यार्थ्यांवर बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कुकरच्या झाकणांनी, लाथा-बुक्क्यांनी मुलांना मारहाण केल्याच्या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये दीपक इंगळे आणि प्रदीप देहाडे या कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत. या घटनेनंतर चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दीपक इंगळे हा गेल्या दहा वर्षांपासून या विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्याने विद्यार्थ्याला कुकरच्या झाकणाने मारहाण केल्याचा व्हिडीओनंतर त्याला निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो संस्थाचालकाचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. तर, प्रदीप देहाडे हा देखील दहा वर्षांपासून या संस्थेत काम करत होता. त्याच्यावरही गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी सांगितले की, या दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे. संस्थेतील इतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाचीही चौकशी केली जात आहे.राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी या प्रकरणी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले मंत्री अतुल सावे?
अतुल सावे म्हणाले, “ज्यांना आपली वेदना सांगता येत नाही, अशा मुलांचा सांभाळ करण्यासाठी सरकारने संस्था उभ्या केल्या. जर या संस्थाच छळछावण्या बनत असतील, तर आपण समाज म्हणून अपयशी ठरलो आहोत. गतिमंद मुलांना सहानुभूती नव्हे, तर सन्मान आणि सुरक्षितता हवी आहे. त्यांच्या अश्रूंवर सरकार, समाज आणि आपली मने जागी झाली पाहिजेत …नाहीतर माणुसकीचं कुकरचं झाकण बंद होईल… कायमचं!” या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, संस्थेवरील देखरेख आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.




