Chhagan Bhujbal : अखेर ‘तो’ दिवस उजाडला; छगन भुजबळांचा आज शपथविधी; कोणतं खात मिळणार?

Chhagan Bhujbal Oath Ceremony : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं असून ते आज (20 मे) राजभवनात सकाळी 10 वाजता मंत्रिपदाची शपथ घेतील. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या जागी भुजबळ यांची निवड होणार असल्याची माहिती मिळत आहे. छगन भुजबळांना धनंजय मुंडे यांचेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय दिलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
यापूर्वी मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज होते. त्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या रिक्तपदी दुसऱ्या ओबीसी चेहऱ्याला संधी दिली जाणार आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज होते. आपली नाराजी त्यांनी उघडपणे बोलूनही दाखवली होती. अखेर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्या रूपाने ओबीसी चेहरा पुन्हा एकदा राष्ट्रवादीने मंत्रिमंडळात आणला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने ओढवलेली ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्याचा हा अजित पवार यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे
मंगळवारी राजभवनात मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीत भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेतील. रात्री उशिरा राजभवनावर यासंबंधीचे पत्र मुख्यमंत्र्यांनी पाठवल्यावर समारंभाची तयारी सुरू झाली. मंगळवारी सकाळी राजशिष्टाचार विभागाच्या अधिकाऱ्यांना राजभवनामध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धनंजय मुंडेंचे खाते छगन भुजबळांकडे?
राज्यासह देशभरात गाजत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खात्याचे पद रिक्त होतं. अशातच ही जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.





