“राज्यपालांनी अर्णव गोस्वामी यांची चिंता करू नये, सरकार त्यांची…”

नाशिक – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (सोमवारी) गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. त्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे.
‘राज्यपालांनी पत्रकार अर्णव गोस्वामींची चिंता करू नये. सरकारी नियमांप्रमाणे सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे’, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यपाल लहानसहान गोष्टींत लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट नाही, असं म्हणत भुजबळांनी खोचक टोला लगावला.
अर्णव गोस्वामी यांना अटक झाली तेव्हापासून भाजपा नेते त्यांना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल (रविवारी) राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली होती. त्यानंतर आज राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटू द्यावे असेही सांगितले.
याशिवाय अर्णव गोस्वामी यांच्या घरात शिरून ज्याप्रकारे पोलीसांनी त्यांना अटक केली, त्याबाबत देखील राज्यपालांनी गृहमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, भाजप आमदार राम कदम आक्रमक झाले आहेत. सोमवारी अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जाणार आहे. हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं म्हणत राम कदम यांनी मुंबई पोलीसांना आव्हान दिलं आहे. 130 कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी अर्णव गोस्वामी यांना भेटायला जाणार आहे, असं त्यांनी ट्विट करून म्हटले आहे.





