Chhagan Bhujbal | “शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच देशाचा विकास” – छगन भुजबळ

प्रभात वृत्तसेवा
नारायणगाव – शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांसह मानवनिर्मित अडचणींचाही सामना करावा लागतो. त्यांच्या कष्टामुळेच देशाचा विकास शक्य झाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यांनी केले. नारायणगाव येथे आयोजित शेतकरी मेळावा आणि कृषि उद्योजक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके, कृषिरत्न अनिल मेहेर, श्री विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, अध्यक्ष सुजित खैरे, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, कार्यवाह रविंद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद मेहेर, संचालक तानाजी वारुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, रमेश भुजबळ, विकास दरेकर, इटीएचएक्स सॉफ्टकॉनचे संस्थापक संचालक ऋजित मेहेर, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, शास्त्रज्ञ, उद्योजक आणि तिनशेहून अधिक शेतकरी उपस्थित होते.
भुजबळांचे प्रतिपादन..
महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन ग्रामीण भागात कृषी व शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविणारी आणि अर्थकारणाला बळकटी देणारी ग्रामोन्नती मंडळासारखी संस्था आजही कार्यरत आहे याचा अभिमान वाटतो. संस्थेनी प्राथमिक शिक्षणासोबत कृषी शिक्षणाचा पाया मजबूत केला असून श्रेय कृषिरत्न अनिल मेहेर यांना जाते. कृषी विज्ञान केंद्र एआय च्या माध्यमातून केळीमध्ये पाणी- खत-कीड व रोग व्यवस्थापनामध्ये अमुलाग्र बदल केला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ व २० ते २५ टक्के उत्पदान खर्च कमी करण्यासाठी प्रयोग करता येईल. एआय तंत्रज्ञान वापरासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. विदेशातील बेदाणा नेपाळ मार्गे भारतात येतो, आणि भारतातील बेदाणा निर्यातीकरिता बंधने येतात. अशी बंधने केंद्र सरकाने हटवली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार.
कृषी प्रदर्शनाची आकर्षक मांडणी..
शेतकरी मेळाव्यानिमित्त कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात विविध कृषि उद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. भुजबळ यांनी या स्टॉलना भेट देऊन तांत्रिक माहिती घेतली. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे यांनी केंद्राच्या कामकाजाचे सादरीकरण केले. शास्त्रज्ञ भरत टेमकर, डॉ. सुयोग खोसे आणि एआय तज्ञ ऋजित मेहेर यांनी केळी पिकातील तांत्रिक प्रयोगांची माहिती दिली.





