Chhagan Bhujbal : ‘सर्वोच्च न्यायालयाचे केवळ निरीक्षण, आदेश नाही’ – छगन भुजबळ

नाशिक – शरद पवारांचे छायाचित्र व नाव आम्ही अलीकडे वापरत नाही काही ठिकाणी चुकून राहिले आहे. यापुढे ते वापरणार नाही. चिन्ह आम्हाला निवडणूक आयोगाने दिले आहे. अजित पवार गटाला घड्याळ तर शरद पवार गटाला तुतारी चिन्ह दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे हे फक्त निरीक्षण आहे. आदेश नाही त्यामुळे काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणानंतर नोंदविली.
मंत्री भुजबळ येवला मतदार संघातील विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने येवला दौऱ्यावर होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. निवडणूका म्हटले की, लोक इकडे-तिकडे जातात यात नवीन काही नाही.
एकदा निवडणुका जाहीर झाल्या की सर्व चित्र स्पष्ट होईल ज्यांना जिकडे जायचे ते तिकडे जातील, अशा शब्दात आमदार निलेश लंके यांच्या शरद पवार गटात जाण्याच्या चर्चेचा समाचार घेतला.
हरिश्चंद्र चव्हाण माजी खासदार आहे. दिंडोरीमधून महायु्तीकडून डॉ. भारती पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने साहजिकच ते उमेदवारीसाठी शरद पवार यांची भेट घेतील त्यात गैर काही नाही. आघाडीकडून कम्युनिस्ट पक्षाचे जिवा पांडू गावितही चर्चेत आहे.
त्याचेही प्रयत्न सुरु आहे. शरद पवार व राहुल गांधी यांच्या सभेचा दिंडोरी लोकसभा मतदार संघात काही फरक पडणार नाही. दिंडोरीत सर्वच ठिकाणी महायुतीचे आमदार आहे. त्यात भारती पवार सर्व गुण संपन्न उमेदवार आहे. जनता त्यांना पसंती देईल असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.





