Chhagan Bhujbal : फडणवीसांची डोकेदुखी वाढली ! नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत भुजबळांची एन्ट्री

नाशिक : नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या शर्यतीत आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही उडी घेतली असून, त्यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सूचक टोला लगावला आहे. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदावरूनही शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद कायम आहे.
भुजबळ-महाजन यांच्यात शाब्दिक चकमक
नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यदिनी गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानिमित्ताने पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केले. याला प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत टोला लगावला. “मी गेल्या १५ वर्षांपासून नाशिकमध्ये ध्वजवंदन करतोय. मला गोंदिया किंवा धुळ्यात ध्वजवंदनासाठी जाण्याचा प्रस्ताव आला, पण मी नाशिक सोडले नाही,” असे भुजबळ म्हणाले.
रायगडमध्येही वाद
नाशिकप्रमाणेच रायगडच्या पालकमंत्रीपदावरूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव आहे. रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ध्वजारोहण केले, तर महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीत शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी ध्वजवंदन केले.
मुख्यमंत्र्यांसमोर तिढा सोडवण्याचे आव्हान
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप कायम आहे. भुजबळ यांच्या नाशिकमधील एन्ट्रीमुळे हा वाद आणखी चिघळला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावर तोडगा काढण्याचे मोठे आव्हान आहे.





