Chhagan Bhujbal : हैदराबाद गॅझेटचा संबंध येतोच कुठून? जीआर मागे घ्या, अन्यथा कोर्टात जाऊ; छगन भुजबळांचा हल्लाबोल

Chhagan Bhujbal on Maratha Reservation GR : मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील २ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयावर (GR) तीव्र नाराजी व्यक्त करत, तो तात्काळ मागे घ्यावा किंवा सुधारावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नाशिक येथील पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी GR मधील “नातेसंबंध” आणि “कुळ” या संदिग्ध शब्दांवर आक्षेप घेत, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले. नाशिक येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले की, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो. त्यांचा हेतू चांगला असेल, त्यांचा अभ्यास आहे. मात्र, ज्या पद्धतीने ड्राफ्टिंग झाले आहे. त्याबाबत आम्ही अभ्यासकांशी बोललो असून ते म्हणाले हे अडचणीचे झालेले आहे. पहिल्या जीआरमध्ये मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र द्या, असा उल्लेख होता. मनोज जरांगे यांनी नंतर त्यांना सांगितले आणि पात्र हा शब्द काढला. यावरुन काय समजायचे? पुढे असे म्हटले की, नातेवाईक आणि नातेसबंध यात फरक आहे. नाते सबंध म्हणजे काय? असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना म्हणाले, काही आयोगाने मराठा समाजाला असं प्रमाणपत्र देता येणार नाही, असं म्हटले आहे. न्यायालयाचे निरीक्षण आहे की, मराठा समाज मागास समाज नाही, हा पुढारलेला समाज आहे. मराठा म्हणून काय किंवा कुणबी मराठा म्हणून देखील ते यात येऊ शकत नाहीत. 3 आयोगाने हे फेटाळले आहे. 1955 सालापासून सांगितले आहे. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. काही केंद्रात गेले पण त्यांनी केले नाही. बॅकवर्ड क्लासचे सर्टिफिकेट खोट्या पद्धतीने मिळविले जातात, हे दुर्दैव आहे, असं म्हणत छगन भुजबळ यांनी कोर्टाचे निरीक्षण वाचून दाखविले.
राजकीय दबावापोटी सामाजिक मागासलेपणा ठरवू शकत नाही. राजकीयदृष्ट्या प्रबळ आहात म्हणून मागास प्रवर्गात समावेश करू शकत नाही. शिंदे कमिटी आली होती, त्यांनी काही लाख कागदपत्रे शोधले. त्यांनी कुणबी प्रमाणपत्र दिले. दोन वर्षे या कमिटीने हैदराबाद, तेलंगणा जाऊन कुणबी नोंदी शोधल्या आहेत. आता त्यात ज्याचा सहभाग नाही, त्यासाठी रस्ता शोधला जात आहे. आता हैदराबाद गॅझेटचा संबंध येतोच कुठून? असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळ एकत्र
इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या तपासणीची प्रादेशिक प्रयोगशाळा नाशिकला सुरू झाली. २०१३ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यासाठी पुढाकार घेतल्याचे मंत्री भुजबळ यांनी आपल्या भाषणात सांगितले. या एका कार्यक्रमानिमित्त थेट केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि मुख्यमंत्री फडणवीस हे नाशिकला पोहोचले. मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री भुजबळ व महाजन हे मुंबईतून एकाच विमानाने ओझरला पोहोचले.





