रासायनिक अस्त्र निरीक्षक सीरियामध्ये दाखल

बैरुत, (सीरिया) : सीरियामध्ये माजी अध्यक्ष असद यांच्या राजवटीमध्ये रासायनिक अस्त्रे वापरली गेल्याच्या संशयावरून तपासणीसाठी जागतिक रासायनिक शस्त्रे देखरेखीच्या संस्थेचे एक शिष्टमंडळ शनिवारी दमास्कसमध्ये दाखल झाले आहे. माजी अध्यक्ष बशर अल असद यांच्या पतनानंतर पहिल्यांदाच सीरियाच्या नवीन नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ सीरियामध्ये आले आहे.
सीरियातील जवळजवळ १४ वर्षांच्या गृहयुद्धात असद सरकारने वारंवार रासायनिक शस्त्रांचा वापर केल्याचे पुरावे ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्सला सापडले आहेत. दमास्कसच्या बाहेरील भागात झालेल्या रासायनिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हवाई हल्ल्याचा धोका टाळण्यासाठी सीरिया २०१३ मध्ये ओपीसीडब्ल्यूमध्ये सामील झाला आणि असद यांनी रासायनिक शस्त्रे वापरली असल्याचा दावा नाकारला होता.
मात्र इस्लामिक स्टेट गटाने मारिया शहराविरुद्ध मस्टर्ड गॅसचा वापर केला होता, असे गेल्या वर्षी संघटनेला आढळून आले. विद्यमान अध्यक्ष अहमद अल-शारा आणि परराष्ट्र मंत्री असद हसन अल-शिबानी यांची भेट घेतलेल्या या शिष्टमंडळात तांत्रिक तज्ञांचा समावेश आहे. हे तज्ज्ञ सीरियाच्या अदिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
असद सरकार उलथवल्यापासून, हेगमधील कतारी दूतावासाने नवीन नेतृत्व आणि ओपीसीडब्ल्यू यांच्यात मध्यस्थ म्हणून काम केले आहे. चर्चा दीर्घ, सकारात्मक आणि अतिशय खुल्या वातावरणात झाली आणि ही भेट ओपीसीडब्ल्यू आणि सीरिया यांच्यात थेट कार्यरत संबंध पुन्हा स्थापित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल होते, असे ओपीसीडब्ल्यूचे महासंचालक फर्नांडो एरियास यांनी एका निवेदनात म्हटले आहे.





