दमास्कस : सीरियाच्या फेरउभारणीसाठी सुमारे २१६ अब्ज डॉलरची आवश्यकता असल्याचे जागतिक बँकेने केलेल्या अंदाजामध्ये म्हटले आहे. सीरियामध्ये जवळपास दशकभरापासून यादवी युद्ध सुरू होते. या कालावधीमध्ये सीरियाचे आतोनात नुकसान झाले आहे. या फेरउभारणीसाठी २१६ अब्ज डॉलर लागू शकतील. ही रक्कम सीरियाच्या २०२४ च्या सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या जवळपास दसपट इतकी आहे. सीरियामध्ये २०११ मध्ये तत्कालीन अध्यक्ष बशर अल असद यांच्या सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. या निदर्शकांवर असद यांच्याकडून क्रूर कारवाई केली जाऊ लागली. त्यातूनच सीरियातील गृहयुद्ध सुरू झाले होते. त्याचे रूपांतर सशस्त्र संघर्षात झाले. डिसेंबरमध्ये बंडखोरांच्या एका जबरदस्त हल्ल्यात असद यांना पदच्युत करण्यात आले. होते. या संघर्षामुळे देशाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आणि त्याच्या विद्युत ग्रिडसह महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले.सीरियाच्या पुनर्बांधणीसाठी १४० अब्ज ते ३४५ अब्ज डॉलर दरम्यान खर्च येऊ शकतो, परंतु २१६ अब्ज डॉलर इतका खर्च येण्याचा अंदाज अधिक अचूक असल्याचे मानले जाते आहे. जागतिक बँकेचा अंदाज आहे की पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी ८२ अब्ज डॉलर खर्च येईल. निवासी इमारतींच्या नुकसानीचा खर्च ७५ अब्ज आणि अनिवासी नसलेल्या इमारतींच्या बांधकामांसाठी ५९ अब्ज डॉलरच्या खर्चाचा अंदाज आहे. अमेरिका आणि युरोपने असद घराण्याच्या राजवटीत लादलेले अनेक निर्बंध उठवले असले तरी, जमिनीवरील त्याचा परिणाम आतापर्यंत मर्यादित राहिला आहेत.