Chaskaman Dam : दोन वर्षांची प्रतीक्षा कायम! चासकमान जलाशयातील लाँच सेवा रखडली, विद्यार्थ्यांचे शिक्षण संकटात

प्रभात वृत्तसेवा
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील चास कमान धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयात प्रवासी लाँचची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गेली दोन वर्षांपासून स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. मात्र या मूलभूत मागणीस जिल्हा परिषदेने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. अखेर वाडा, साकुर्डी आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.चास कमान धरणामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील वाडा परिसर दोन भागांत विभागला गेला आहे. वाडा हे पश्चिम भागातील प्रमुख बाजारपेठ असून बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा येथे उपलब्ध आहे.
धरण झाल्यानंतर साकुर्डी, कहू, कोयाळी, माजगाव, वाळद, दरकवाडी, देवोशी, औदर, चिखलगाव आदी गावे आणि त्यांच्या वाड्यावस्त्यांतील नागरिकांना जलाशय पार करताना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे.दरवर्षी जून ते एप्रिल या काळात या गावांतील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार व दूध उत्पादकांना जलाशय ओलांडण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो. या प्रवासात जीविताचा धोका निर्माण होत असून विशेषतः शाळकरी विद्यार्थी आणि महिला प्रवाश्यांना भीती वाटते.
पावसाळ्यात होडी प्रवास अधिकच धोकादायक ठरतो. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होत असून महिलांनाही रोजच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागतो.गेल्या दोन वर्षांपासून हुतात्मा राजगुरू जलाशयात प्रवासी लाँच सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेकडून आश्वासने दिली जात आहेत. लाँच तयार असल्याचे सांगण्यात येते, परंतु ती अद्याप जलाशयात दाखल झालेली नाही. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर साकुर्डी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी साकुर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणीताई गवारी, जानकी माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गुलाब कडू, पोलीस पाटील मारुती चौधरी, सेवानिवृत्त अधिकारी मुरली देवदरे, बाबाजी कडलग, ओकार गवारी आदी उपस्थित होते.नवीन लाँच कार्यान्वित झाल्यानंतर वाडा-साकुर्डी परिसरातील नागरिकांना सुरक्षित, जलद आणि स्वस्त प्रवासाची सुविधा मिळणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाणे सोपे होईल, रुग्णांना दवाखान्यात पोहोचवणे सुलभ होईल, तसेच स्थानिक पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
लाँच लवकरच दाखल होणार..
खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन विभाग, जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून भिमाशंकर प्रवासी लाँचसाठी एक कोटी चाळीस लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या ही लाँच बांधून पूर्ण झाली असून लवकरच चास कमान धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयात दाखल होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा प्रवास सुखकर होईल, असे साकुर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणीताई गवारी यांनी सांगितले.





