nagar news : स्वस्त धान्य दुकानाचा अनागोंदी कारभार

पाथर्डी (प्रतिनिधी) – पाथर्डी शहरातील आखर भाग, आष्टवाडा, चौंडेश्वरी गल्ली येथील महिलांनी सामजिक कार्यकर्ते प्रशांत शेळके यांच्या नेतृत्वाखाली आमदार मोनिका राजळे यांची भेट घेऊन निवेदन दिले . स्वस्त धान्य दुकाने बाबत येणाऱ्या अडचणी बाबत तक्रारींचा पाढा वाचला. दरम्यान, स्वस्त धान्य दुकानातील अनागोंदी कारभाराची आमदार मोनिका राजळे यांनी त्वरित दखल घेत, याप्रकरणी तहसीलदार शाम वाडकर यांना हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी सूचना केली आहे.
स्वस्त धान्य योजनेअंतर्गत कोरोना महामारीनंतर आजपर्यंत या योजनेमधून धान्य मिळालेले नाही. याबाबत चौकशी करण्यासाठी दुकानदाराकडे गेलो असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे शहरातील अनेक कुटुंबे स्वस्त धान्यापासून वंचित असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शहरात अनेक शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानावर धान्य मिळत नाही.
तुमची शिधापत्रिका ऑनलाईन नोंदणी करून घ्या. शिधापत्रिका अपडेट नाही. तुम्ही तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस धान्य घेतलेले नाही, त्यामुळे धान्य मिळणार नसल्याची उत्तरे मिळतात. नागरिक तहसील कार्यालयात गेल्यास त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित नसतात किंवा कागदपत्र अपूर्ण असल्याचे उत्तर मिळते, परंतु योग्य मार्गदर्शन कुठेही मिळत नाही.
त्यामुळे नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत असून, त्यात पैसा व वेळ वाया जाऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्वस्त धान्य दुकानदाराची सखोल चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर सुलोचना तरटे, मीरा मंचरे, सुनीता हाडदे, मीना शेळके, मंगल भागवत, मीना मरळीकर, लीला ताटपुरकर, मनोषमा सदावर्ते, सुमन ताटपूरकर,शीतल कांबळे, प्रतिज्ञा मेघुंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.





